आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Has Anupam Kher Done To Deserve Padma Award Kadar Khan Raises Question

\'पद्म\' देण्याइतपत अनुपम खेरने काय दिवे लावले? कादर खान यांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अनुपम खेर याने असे काय योगदान दिले आहे जेणेकरून त्याला पद्म पुरस्कार दिला गेला आहे, असा सवाल जुनेजानते व बुर्जूर्ग अभिनेते कादर खान यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय अनुपम खेरने दुसरे काहीही केले नाही. त्यामुळेच त्याला पद्म मिळाला. बरं झालं मला पद्म मिळाला नाही. पण मी कोणाची स्तुती करणार नाही असेही कादर खान यांनी म्हटले आहे.
इंग्रजी वृत्तपत्र 'एचटी'शी बोलताना कादर खान यांनी पद्म पुरस्कार अलीकडच्या काळात कसे व कोणाला दिले जातात यावर भाष्य केले. कादर खान म्हणाले, बरं झाल मला पद्म पुरस्कार मिळाला नाही. मी माझ्या आयुष्यात स्वार्थासाठी कधीच कोणाचा लाळघोटेपणा केला नाही. यापुढे करणार नाही. पूर्वी पद्म पुरस्कारांना महत्त्व होते. खरं तर लोकांना पद्म दिल्याने त्याचे महत्त्व वाढते. मात्र, अलीकडे पद्म देऊन एखाद्याचे महत्त्व वाढवले जाते. अलीकडच्या काळात दिलेल्या पद्मपुरस्कारावरून हेच दिसते. अनेकांना केवळ सत्तेतील लोकांच्या मागेपुढे केल्याने पुरस्कार मिळाल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने पुरस्कार देणार आणि मिळणार असतील तर असला पुरस्कार मला नको. लोक आता स्वार्थी झाल्याने ते इतरांचा आदर करणे विसरले आहेत. यावर्षी काहींनी माझ्या नावाची शिफारस केली. त्यांचे मी आभार मानतो. मात्र यावर्षी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्याइतका मी सक्षम नसेल असे सांगत पद्म पुरस्कार घोषणेवर बोट ठेवले.
आपल्याला माहित असेलच की 25 जानेवारी रोजी बॉलिवूडमधील अनेकांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रजनीकांत, अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, मधुर भंडारकर, एसएस राजामौली, उदित नारायण आणि मालिनी अवस्थी आदींचा समावेश होता. मात्र, रजनीकांत व अनुपम खेर वगळता नवख्यांना पुरस्कार दिल्याचे लक्षात येते. मात्र, यात बुर्जूर्ग व जुनेजानते अभिनेते कादर खान यांच्या नावाचा समावेश नव्हता. काँग्रेस सरकारनेही मागे सैफ अली खान याला पद्म पुरस्कार दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. एकूनच सरकार कोणाचेही असो अलीकडे पद्म पुरस्कार मर्जीतील लोकांनाच दिले जातात हे स्पष्ट होत आहे.
अनुपम खेर हे भाजपच्या खासदार किरण खेर यांचे पती आहे. अनुपम खेर यांनी मोदींच्या बाजूने मध्यंतरी दिल्लीत लाँग मार्च काढला होता. या मार्चमध्ये मधुर भंडारकर व मालिनी अवस्थी यांनी हिरारीने सहभाग घेतला होता. तर रजनीकांत यांनी तामिळनाडूत मोदींच्या व्यासपीठावर हजेरी लावून एकप्रकारे भाजपचा प्रचार केला होता. उत्तर भारतीय उदित नारायण हे भाजपच्या जवळचे मानले जातात. प्रियांका चोप्रा, अजय देवगण यासारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटीजनी भाजपचा प्रचार केला आहे.
79 वर्षीय कादर खान सध्या मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. सार्वजनिक वावर त्यांचा आता थांबलेला आहे. कादर खान यांनी आपल्या अभिनयाने व विनोदी शैलीने प्रत्येक भारतीयाला निखळ आनंद दिला आहे. 'हो गया दिमाग का दही' हा फौजिया आरशी यांच्या चित्रपटात शेवटचे ते दिसले आहेत.