आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची नुसतीच चर्चा, आज घेणार अंतिम निर्णय, भाजपने 80 % मागण्या केल्या मान्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे विरोधी पक्षात बसण्याची भूमिका जाहीर करतानाच दुसरीकडे, पुन्हा भाजपशी चर्चेचा पर्याय खुला असल्याचे सांगत शिवसेनेने शेवटपर्यंत आपल्या भूमिकेतील सस्पेन्स व संभ्रम कायम ठेवला आहे. मंगळवारी विश्वासदर्शक ठरावाच्या आदल्या दिवशीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली, मात्र भाजपला पाठिंब्याबाबत मात्र ठाेस निर्णय जाहीर केला नाही. बुधवारी सकाळीच आम्ही अंतिम निर्णय जाहीर करू, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला.

सोमवारी अधिवेशन सुरू झाल्यानंतर शिवसेनेने विरोधी बाकावर बसून विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला. मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदासाठीही विजय औटी यांचे नाव पुढे केले. संध्याकाळी आमदारांची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या शिवसेना उमेदवारालाच मत देण्याचा व्हिप उद्धव यांनी जारी केला. भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची ही खेळी होती. मंगळवारी दिवसभर उद्धव यांनी नेत्यांशी भाजपासोबत जायचे की नाही याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे समजते. मात्र त्यानंतरही भाजपकडून एेनवेळी काही प्रस्ताव येताे काय या आशेवर अंतिम निर्णय बुधवारपर्यंत पुढे ढकलला.

मोदी-शहांनी निर्णय घेतला, शिवसेनेच्या ८०% मागण्या मान्य!
भाजप नेते शिवसेनेला सोबत घेण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याऐवजी शिवसेना सोबत आली तर जनतेत चांगला संदेश जाईल, असे नेत्यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शहा यांच्या गळी उतरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. परदेश दौ-यावर जाण्याआधी मोदी व शहा यांनी शिवसेनेबाबतचा निर्णय घेतला असून, त्यानुसार शिवसेनेच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्याचे सूत्रांनी म्हटले.

आधीचा व्हीप रद्द करण्याची शक्यता
शिवसेनेतील सूत्रांनुसार, सत्तेत सहभागाबाबत भाजपशी चर्चा सुरू असून अमित शहा यांच्याकडून प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला आहे. काही मंत्रिपदांबाबत स्पष्टता न आल्याने शिवसेनेने निर्णय प्रलंबित ठेवला. आता व्हीप काढला असला तरी सत्तेत योग्य तो वाटा मिळाल्यानंतर तो व्हीप रद्द करत अध्यक्षपदासाठी भाजपच्या हरीभाऊ बागडे यांना शिवसेना मतदान करू शकते.