आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whats U R Taking Efforts For Control Pollution ??

प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय योजले? उच्च न्यायालयाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सुचवलेल्या उपाययोजनांसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी नाशिक महापालिका आयुक्तांना दिले. तसेच, 2 एप्रिल रोजी होणा-या या प्रकरणाच्या सुनावणीत पोलिस उपायुक्तांना हजर राहण्याविषयीही सांगितले आहे.

गोदावरी गटारीकरण विरोधी समितीच्या वतीने नदीच्या प्रदूषणाविरोधात राजेश पंडित व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला. मागील सुनावणीच्या वेळी गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी नाशिक महापालिकेला काही उपाययोजना सुचवल्या होत्या. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत 31 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले. तसेच, नदीपात्रात गाडी धुणा-या अथवा जल प्रदूषणाला कारणीभूत ठरणा-यांवर कशा प्रकारे कारवाई करता येईल, याची माहिती देण्यासाठी पोलिस उपायुक्तांना पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले.

काय आहे याचिका?- गोदावरी प्रदूषित झाली आहे. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण खालावल्याने नदीची जैवसंस्था धोक्यात आली आहे. तिचे पाणी पिण्यायोग्य उरलेले नाही. तशा आशयाचे फलक नदीकाठावर लावण्याची गरज आहे. धार्मिकदृष्ट्या पवित्र मानण्यात येणाºया सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर नदीच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याची गरज आहे, आदी मुद्दे राजेश पंडित यांच्या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.