मुंबई- पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रस्ताव सादर करूनही नामकरण का होत नाही असा संतप्त सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी करीत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या गोल-गोल उत्तरामुळे वैतागून चालू बैठकीतून भुजबळ बाहेर पडले.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने केली आहे. हे नामकरण व्हावे यासाठी स्वत: भुजबळ आग्रही आहेत. पुणे विद्यापीठाने तो प्रस्ताव मंजूर करून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पाठवला आहे. त्याआधी राजकीय व सामाजिक पातळीवर फुले यांचे नाव देण्यास विरोध झाला होता. फुले यांचे नाव देण्यास तथाकथित उच्चभ्रू लोकांचा विरोध आहे. यावर कशी तरी मात करून तो प्रस्ताव मंजूर करून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. मात्र त्यांच्या स्तरावर हा निर्णय पडून आहे. भुजबळ यांनी पुणे विद्यापीठाला फुले यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे साठी मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्रव्यवहार केला होता. मात्र, चव्हाण यांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच भुजबळ यांना लेखी उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही. विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. हे सरकार पुन्हा येईल की नाही याचा अंदाज सध्या कोणालाही लागत नाही.
राज्य सरकारने नुकताच मराठा व मुस्लिम आरक्षणाचा विषय मार्गी लावला. त्यामुळे भुजबळ आपल्या तयारीला लागले आहेत. राजकारणाबरोबर समाजकारणावर त्यांनी भर देण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. लोकसभेत भुजबळ यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे पुन्हा आक्रमक लयीत आल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच काल (बुधवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळांनी हा विषय काढून वातावरण तापवले.
(छायाचित्र- छगन भुजबळ)
पुढे वाचा, अजित पवार, नारायण राणेंचा सूर भुजबळांच्याविरोधात...