आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र टोलमुक्त करून दाखवा, सिब्बल यांचे भाजपला आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देश काँग्रेसमुक्त करण्याची बात सोडा; आधी महाराष्ट्र टोलमुक्त करून दाखवा, असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी भाजपला शनिवारी दिले. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने देशाच्या जनतेला अच्छे दिन दाखवले तर नाहीतच किमान सच्चे दिन तर दाखवावेत, असा जोरदार टोलाही सिब्बल यांनी लगावला.

नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडला. राज्यात सत्तेवर येण्याआधी भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी टोलवरून रान उठवले होते.

सत्ता हाती येताच राज्य टोलमुक्त करण्याच्या बाता मारल्या होत्या. पण सत्तेवर येताच त्यांना आपली आश्वासने आता आठवत नाहीत. भाजपचे केंद्रातील मंत्री िनतीन गडकरी यांनी तर राज्य टोलमुक्त होणे कठीण असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता राज्य सरकारने खोट्या आश्वासनाचे अच्छे दिन दाखवण्याच्या खटपटी करू नयेत. वास्तव काय आहे ते एकदाचे लाेकांना सांगूनच टाकावे.

पंतप्रधान मोदी ५३ दिवस देशाबाहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५३ दिवस देशाबाहेर होते, तर ४८ दिवस त्यांनी देशात दौरे केले. यामुळे त्यांना देशात काय चालले आहे, याची कल्पना नसावी. म्हणूनच आता त्यांनी थोडे देशाच्या कारभारात लक्ष घालण्यासाठी परदेश दौरे थाेडे कमी करायला हवेत. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नाॅर्थ ब्लाॅकच्या खाली उतरण्याची तसदी घ्यावी. अन्यथा देशातील महागाईची त्यांना कल्पना येणार नाही, अशी टीका सिब्बल यांनी केली.

जनधन योजना फ्लॉप ठरली
जनधन योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. १४ कोटी खाती उघडण्यात आली. मात्र, १४ पैकी ८ कोटी खातीही सुरू नाहीत. फक्त उघडली आणि बंद झाल्याने सरकारच्या तिजोरीला तब्बल १६ कोटींचा फटका बसला, असा त्यांनी पोलखोल केला.

प्रत्येक संस्थेत संघाची माणसे
भारत हा निधर्मी विचारांचा लोकशाही देश असताना मोदी सरकारच्या कालावधीत देशाच्या प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची माणसे आणली जात आहेत आणि हे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे मत सिब्बल यांनी व्यक्त केले.

माहितीच मिळत नाही, तर भ्रष्टाचार कसा कळणार?
गेल्या आठ महिन्यांपासून माहिती आयोगाला अध्यक्ष नाही. यामुळे माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेले तब्बल २९ हजार अर्ज पडून आहेत. यामुळे माहितीच मिळत नसेल तर मोदी सरकारने एक वर्ष पूर्ण केले असताना भ्रष्टाचार केला की नाही, हे कसे कळणार? आम्ही भ्रष्टाचारमुक्त आहोत, हे छातीठोकपणे सांगण्याची इतकी घाई भाजपच्या सरकारने करू नये. महाराष्ट्रात भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही, तर मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराच्या नवनव्या घटना बाहेर येत आहेत, असे सिब्बल म्हणाले.