आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका-टिप्पण्यांनी रविवार गाजत असताना उध्‍दव म्हणतात, मुख्यमंत्री कोण हेच महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गुजरातचा विकास तुम्ही देशाला दाखवलात. नंतर संपूर्ण देशाचा विकास करून दाखवेन, असे सांगून तुम्ही देशासमोर आला. आम्हीही तुम्हाला स्वीकारले. मात्र, जेव्हा तुम्ही गुजरातचा विकास केला तेव्हा केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. मनमोहन तेव्हा पंतप्रधान होते. केलात ना विकास. सरकार कोणत्या पक्षाचे याला महत्त्व नाही, तर मुख्यमंत्री कोण याला महत्त्व आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांना ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार येईल आणि कर्नाटकातील महाराष्ट्रव्याप्त भाग परत मिळवीन,’ असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

रविवारी मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर तोंडसुख घेत त्यांच्या (भाजपच्या) सभेसाठी गुजरातमधून बसेस भरून आणल्या जात आहेत, असा आरोप केला. ‘शिवसेनाप्रमुख असते तर युती तुटली नसती,’ असे भाजप नेते सांगत आहेत. मात्र, वास्तविक ते असते तर युती तोडण्याची त्यांची हिंमतच झाली नसती, असे सांगतानाच ‘वाजपेयी यांच्याकडे भाजपची सूत्रे असती तरीही युती तुटली नसती,’ असा टोलाही उद्धव यांनी लगावला. भाजपच्या अटी मान्य केल्या असत्या तर शिवसेना संपली असती, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.

‘केंद्रातले संपूर्ण मंत्रिमंडळ व गुजरातच्या मुख्यमंत्रीही प्रचारात उतरल्या आहेत,’ हे सांगतानाच मुंबईतील गुजराती समाज शिवसेनेसोबत असल्याचा दावा उद्धव यांनी केला. आमच्याच व्हिजन डॉक्युमेंटमधील काही मुद्देच भाजपने आपल्या दृष्टिपत्रात घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन वर्षांत ५० योजना पूर्ण करेन, असे आश्वासनही उद्धव यांनी दिले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यातले नेते मोदी यांना फसवत असल्याचे सांगून या पक्षाला गाडा, असे आवाहन शिवसैनिकांना केले.
पाणीही न देणारे सरकार हवेच कशाला?
‘आघाडी शासनाकडे शेतकरी बंगला-गाडी नव्हे, तर फक्त पाण्याची मागणी करीत आहे. मात्र, दुर्दैवाने तीदेखील मागणी शासन पूर्ण करू शकत नाही, असे सरकार हवेच कशाला? काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारने पंधरा वर्षांत महाराष्ट्राची दुर्दशा केली,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे देशातील प्रत्येक शेतक-याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
भाजपप्रणीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, खासदार शरद बनसोडे आदी उपस्थित होते. मोदींच्या तुळजापूर, लोहा येथेही जाहीर सभा झाल्या. या सभांमध्ये मोदी म्हणाले, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ३७०० शेतकरी आत्महत्या करीत आहेत. प्रत्येक वर्षी त्यात वाढ झाली आहे. मात्र आघाडी शासनातील एकाही मंत्र्यांच्या डोळ्यात साधे अश्रू उभे राहत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात राज्याचे वाटोळे झाले. आघाडी सरकारने महाराष्ट्रातील तिजोरी रिकामी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्याच्या राजकारणातून या पक्षांना उखडून फेका, असे आवाहन मोदींनी केले.
देशातील प्रत्येक शेतक-याला पाणी देण्यासाठी केंद्राद्वारे लवकरच नदी जोड प्रकल्प हाती घेऊन कृषी सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या राज्यात भाजप महायुतीला बहुमत मिळाल्यास सरकार गरीब शेतक-यांचे जीवनमान बदलण्यासाठी भरघोस मदत करेल, अशी ग्वाहीही मोदींनी दिली.
पंढरीत आगळावेगळा सत्कार
मोदी यांचा पागोटे, वीणा आणि चिपळ्या भेट देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. मोदींनी एका हाताने गळ्यातील वीणेची तार छेडून दुसरा हात उंचावून बोटातील चिपळ्या एकमेकांवर वाजवून जनतेला अभिवादन केले. या वेळी मोदींच्या खांद्यावर उपरणे घालून त्यांना भव्य असा तुळशीचा हार घालण्यात आला. तसेच श्री पांडुरंगाची भव्य अशी स्वयंभू मूर्ती असलेली प्रतिमा भेट देण्यात आली.