आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादरचा ‘किल्ला’ कोणाच्या वाट्याला आठवलेंच्या की जोशी सरांच्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत दादरमधील सर्व जागा शिवसेनेने गमावल्यानंतर ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचे पक्षातील स्थान डळमळीत झाले होते. हे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी जोशी सरांनी आगामी लोकसभा निवडणूक दादरमधून (दक्षिण मध्य मुंबई) लढवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी फील्डिंगही लावली. परंतु महायुतीतील घटक असलेल्या रामदास आठवले यांनीही यापूर्वी याच मतदारसंघाची मागणी केल्याने आठवले आणि जोशी यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.


दादर शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु मनसेने या भागात आपली ताकद वाढवून शिवसेनेला जवळजवळ संपुष्टात आणले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला याचा मोठा फटका बसला आणि मनपा निवडणुकीत तर पक्षाला सर्वच जागा गमवाव्या लागल्या. मनसेने दक्षिण मध्य मतदारसंघातील सर्वच्या सर्व म्हणजे 10 जागांवर विजय मिळवला होता. बाळासाहेब ठाकरे यांनाही या गोष्टीचे प्रचंड दु:ख झाले होते. या पराभवानंतर जोशी पक्षात अडगळीला पडले. मात्र, गेलेली पत पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पदाधिका-यांची एक बैठक घेऊन स्वत:च्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच उद्धव यांच्याकडे याबाबतचा संदेश पोहोचवला. एवढेच नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याने मनसे आपल्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही, असेही सरांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकल्याचे समजते.


खात्री नाहीच !
मनोहर जोशींच्या नावाचा विचार सुरू असला तरी त्यांना तिकीट मिळेल याची खात्री नाही. जोशी स्वत:च अशा बातम्या पसरवत असल्याचे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.