आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Give Seat?, Shivsena Ask Question To BJP Leaders

जागा सोडायच्या कुणी?, शिवसेना नेत्यांचा भाजपला प्रश्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत मनसेला घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याने शिवसेनेमध्ये नाराजी आहे. ‘उद्या मनसे महायुतीत आली तर त्यांच्यासाठी लोकसभेला तीन जागा सोडणेही कठीण आहे. मात्र, त्यांना जागा सोडण्याबाबतचा खरा प्रश्न उपस्थित होईल तो विधानसभेच्या वेळी. मनसे 50 ते 60 जागांपेक्षा कमी जागा पदरात पाडून घेण्यास तयार होणार नाही. या जागा नेमक्या सोडायच्या कोणी?’ असा प्रश्न शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना उपस्थित केला.


भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत अस्वस्थता दिस आहे. भाजपला मनसेची स्वप्ने पडत असल्यास त्यांनी जागा सोडण्याची तयारी दाखवावी, अन्यथा शिवसेनेच्या व पर्यायाने भाजपच्याही कार्यकर्त्यांच्या मनात अशा प्रकारचा संभ्रम तयार करणे हे निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवहार आहे, असा टोलाही शिवसेना नेत्यांनी लगावला.


अन्यथा वेगळा निर्णय
एकंदर फडणवीसांच्या सातत्याने मनसेचा जप करण्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कारण नसताना दरी वाढवण्याचेच काम होत असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. असेच सुरू राहिल्यास याबाबत भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे यासंदर्भातील मत आजमावले जाईल व त्यानंतर शिवसेना मोठा निर्णय घेण्यासाठी मोकळी असेल, असेही एका शिवसेना नेत्याने म्हटले आहे.


मोदींकडून महाराष्ट्र भाजपला धडे
भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 27 जून रोजी मुंबईत येणार आहेत. या वेळी ते भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची विशेष बैठक घेतील. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील परिस्थिती, भाजपचा अजेंडा, प्रचाराचे विषय अशा विविध मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत.


राजबाबत चर्चा होण्याची अपेक्षा
महायुतीत मनसेला घेण्याबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, तसेच मोदी व राज ठाकरेंची जवळीकही सर्वश्रुत आहे. त्यामुळे 27 जून रोजी मुंबईत मोदींसोबत होणा-या बैठकीत फडणवीस मनसेचा मुद्दा उपस्थित करतील, असा अंदाज आहे. त्यावर मोदी व पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.