आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलती ‘ट्रिपल एस’लाच का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ट्रिपल एस’ म्हणजे सातारा, सांगली आणि सोलापूरलाच दुष्काळाच्या सवलती का मिळतात?, असा आक्षेप विदर्भातील मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्याचा आढावा घेण्याऐवजी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असे वातावरण निर्माण झाले होते.

बैठकीच्या सुरुवातीला पतंगराव कदम यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याचे यांनी सांगितले. त्यावर ‘हे धोरण ‘ट्रिपल एस’साठी का?’ असा सवाल करत नितीन राऊत यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले. ‘ट्रिपल एस’ म्हणजे काय? असे पतंगरावांनी विचारले असता ‘सातारा, सांगली आणि सोलापूर’ असे उत्तर मिळाल्यावर मंत्रिमंडळामध्ये खसखस पिकली. नागपूरमधील मौदा तालुक्यांत 124 गावे, बुलडाण्यामधील 137 गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे सातारा, सांगलीप्रमाणे त्यांनाही 10 कोटी रुपये द्या, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच दुष्काळासाठी मिळणारा निधी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. त्यामुळे चिडून कदम यांनी दुष्काळाच्या समित्याच बरखास्त करून टाका, असे म्हटले.

चा-या साठीचा निधी घटला
चा-या साठी देण्यात येणारा निधी प्रतिजनावर 80 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आला आहे, तर लहान जनावरांना 30 रुपये देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिका-या कडे आहेत. चारा छावण्या चालवण्यासाठी अनेक ठिकाणी संस्था पुढे येत नाहीत, अशी तक्रार मराठवाड्यातील मंत्री राजेश टोपे आणि मधुकर चव्हाण यांनी केली. त्यामुळे सरकारच ती जबाबदारी घेईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.