आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन सांत्वन केलेल्या विधवा शेतकरी महिलेची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. - Divya Marathi
फाईल फोटो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.
यवतमाळ/मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या घरी जाऊन सांत्वन केलेल्या महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्हात उघडकीस आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुटी गावातील विधवा महिला शांता ताजणे (55) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. चार वर्षापूर्वी शांताबाईचे पती प्रल्हाद ताजणे यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. दरम्यान, या महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण दु:खी झाल्याचे म्हटले आहे. शांताबाईंची आत्महत्या अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 मार्च 2015 रोजी या आत्महत्याग्रस्त विधवा महिलेची सात्वंन पर भेट घेतली होती. तसेच त्यावेळी फडणवीस यांनी शांताबाईंना विंधन विहीर, मोटारपंप व विद्युत जोडणी मंजूर केली होती. तसेच त्यांना सरकारच्या धोरणानुसार 70 हजार रूपयांची मदत मंजूर झाली होती. ती रक्कम त्यांच्या बॅंक खात्यातही जमा झाली होती. मात्र, पैसे काढण्यासाठी काही जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. त्यामुळे शांताबाईला पैसे वठविता आले नाहीत. परिणामी खरीपासाठी हातात पैसे नसल्याने हताश झालेल्या शांताबाईंनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, ती रक्कम संकट काळातच फक्त काढता येते याची माहिती नसल्याने सरकारनेही आपली फसवणूक केल्याची समजूतीतून शांताबाईंनी आत्महत्या केल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील रातचांदणा, घोरखिंडी व पिंपरी बुटी गावांना भेटी देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी 3 मार्च रोजी पिंपरी बुटी गावातच मुक्काम केला होता. त्यावेळेस फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या होत्या, तसेच यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, मागील तीन-चार महिन्यातही यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेतक-यांना आत्महत्येपासून वाचवायचे असेल संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असल्याचे म्हटले होते. चव्हाण यांच्या वक्तव्याची यानिमित्ताने आठवण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...