आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: शहीद जवानांच्या वीरपत्नींची अपेक्षा, कायमस्वरुपी नाेकरी अन‌् मुलांच्‍या शिक्षणाची साेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा वाघ यांच्‍या पतीला वीरमरण आले. आता त्‍या दोन मुलांना वाढवण्‍याचा एकाकी झगडा देत आहेत. - Divya Marathi
रेखा वाघ यांच्‍या पतीला वीरमरण आले. आता त्‍या दोन मुलांना वाढवण्‍याचा एकाकी झगडा देत आहेत.
‘ये मेरे वतन के लोगो..’ हे लतादिदींचे आर्त सूर शहिदांच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावतील. इतिहासातील पराक्रमाच्या या गाथेने सगळ्यांची छाती देशाभिमानाने फुगेल. त्याचवेळी पुण्यातील सोनाली फराटे, सांगलीच्या वर्षा चौघुले, परभणीच्या अंजना अंबोरे आणि साताऱ्याच्या रेखा सूर्यवंशी या साऱ्या शहीद जवानांच्या विधवा मात्र उद्याच्या काळजीने काळवंडलेल्या आहेत. शहिदाच्या पश्चात मिळालेल्या सरकारी निधीवर दावा सांगत सासरच्यांनी घराबाहेर काढलेल्या, परीक्षा देत नोकऱ्यांसाठी झगडणाऱ्या, रात्रीचा दिवस करून पतीच्या पश्चात कुशीतल्या लहान्यांना मोठ्या करणाऱ्या. कुणी मुलांच्या फीसाठी सरकारदरबारी चकरा मारत आहेत, तर कुणी नोकरी मिळण्यासाठी वणवण करीत आहेत.  राज्य सरकारने केवळ पैसे देऊन कर्तव्य निभावण्यापेक्षा अाम्हाला कायमस्वरुपी नाेकरी उपलब्ध करुन द्यावी तसेच अामच्या मुलांना माेफत शिक्षणाच्या साेयी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा अपेक्षा या वीरपत्नी व्यक्त करत अाहेत.
 
सीमेवर देशाचे रक्षण करताना कामी आलेल्या शहीद जवानांच्या मृत्यूनंतरचे दहा दिवस त्यांचे कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी राहते. शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होतात, मंत्री, नेते, आमदार, खासदार यांच्या भेटी होतात. त्यांना मानवंदना देणारी होर्डिंग गावात झळकतात. अनेकांना मरणोत्तर गौरवचक्र दिली जातात, अनेक संस्था-संघटना त्यांचे सत्कार करतात. पण, महिनाभरानंतर तिच्या वाट्याला येते फक्त परवड. सरकारी कार्यालयांतील खेट्या आणि भविष्याची चिंता.
 
माजी सैनिकांप्रमाणे वीरपत्नींनाही नागरी सेवेत सामावून घ्यावे यासाठी महाराष्ट्रातील शहिदांच्या या २० विधवा झगडत आहेत.  आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला सरकारी सेवेत संधी मिळावी आणि शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी व्हावी एवढ्याच त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी झगडणाऱ्या राज्यातील
वॉर विडोजचा हा ‘दिव्य मराठी’चा स्वातंत्र्य दिन विशेष वृत्तांत.
 
रेखा वाघ
शहीद जवान कैलास वाघ यांच्या वीरपत्नी
वय : २४ वर्षे, शिक्षण : एम. ए.
मुले दोन  : अथर्व (७ वर्षे), क्षितीज (४ वर्षे)   
मु. मांजरगाव, बदनापूर, जि. जालना

पतीला वीरमरण आले तेव्हा दुसरा मुलगा त्यांच्या पोटात होता. पतीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी  मंत्र्यांनी दिलेले जमिनीचे आश्वासन खोटे असल्याचे रेखाताईंना दोन वर्षे सरकारदरबारी चकरा मारल्यावर कळाले. त्यानंतर पतीच्या वारसाहक्काची दोन एकर जमीन मिळावी  यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. आज दोन मुलांना घेऊन त्या भावाच्या आधाराने औरंगाबादमध्ये रहात आहेत. शहीद जवानाची चिता विझताच ही सारी आश्वासने वाऱ्यावर उडून गेली आणि त्याची वीरपत्नी दोन मुलांना वाढवण्याचा एकाकी झगडा देत आहेत.
 
हेही वाचा,
 
बातम्या आणखी आहेत...