आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात तांदळाचा पुरेसा साठा, भाव नियंत्रणातच राहतील- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून मोठी आवक आणि शासनाकडून झालेली चांगली खरेदी यासोबत तांदळाचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. तसेच राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना शासनाकडून प्रतिकिलो तीन रुपये या सवलतीच्या दरात तांदळाचे वाटप केले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात राहणार असून जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळींपाठोपाठ तांदळाच्या भावात मोठी वाढ होईल असा अंदाज काही व्यापा-यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे खंडन केले आहे.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 8 कोटी 77 लाख 19 हजार लाभार्थ्यांपैकी अंत्योदय अन्न योजनेतील व बीपीएलमधील सर्व तसेच एपीएल (केशरी) मधील काही अशा एकूण 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अन्नधान्याचा लाभ मिळत आहे.
अंत्योदय अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका दरमहा 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील प्रतिव्यक्ती दरमहा 5 किलो याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत असून या सर्व लाभार्थ्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदळाचे वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना दरमहा 1 लाख 68 हजार 425 मे. टन तांदळाचे वाटप केले जात आहे. राज्यातील जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना सवलतीच्या दराने शासनाकडून तांदळाचे वाटप केले जात असल्याचे स्पष्ट होते. तसेच राज्यात पुरेसा साठाही उपलब्ध आहे. याशिवाय तांदळाची मोठी आवक होत असून खरेदीही भरपूर प्रमाणात झाली आहे. त्यामुळे तांदळाचे भाव वाढणार असल्याबाबतचे वृत्त निराधार असून सर्वसामान्य जनतेने काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.