आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will We Get Water This Year Asks Angry Marathwada Legislators

यंदा तरी पाणी मिळेल काय? मराठवाड्यातील आमदारांचा सरकारला संतप्त सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोदावरी खोर्‍यातील पाणी नियोजनाच्या मुद्द्यावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार गुरुवारी विधान परिषदेत संतप्त झाले होते. त्यामुळे ऑक्टोबरअखेरीस राज्यातील पाणी वाटपाचे नियोजन केले जाईल आणि मराठवाड्यावर यंदा अन्याय होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिली.

मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, असा मुद्दा शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दुष्काळाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील नागरिकांना बसला आहे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्यामुळे परिस्थिती खूप तीव्र बनली होती. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला मागच्या वर्षी विलंब झाल्याने नऊ टीएमसी पाणी सोडूनही अवघे तीन टीएमसी पाणीच धरणात पोहोचले. त्यामुळे राज्य शासन यंदा तरी वेळेत निर्णय घेऊन पाणी वाटपाचे नियोजन करणार का, असा सवाल मराठवाड्यातील सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला होता.


चुकीची पुनरावृत्ती होणार नाही : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माणूस अनुभवातूनच शिकत असतो. गेल्यावर्षीच्या चुकीची पुनरावृत्ती यंदा होणार नाही. पावसाळा संपताच पाणी वाटपाचे नियोजन केले जाईल. मराठवाड्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.


अहवाल येताच नियोजन करू
जायकवाडीच्या उर्ध्व बाजूला अधिक क्षमतेची धरणे बांधण्यात आली आहेत, त्यामुळे जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मेंढेगिरी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल येत्या पंधरवड्यात अपेक्षित आहे. तसेच या अनुषंगाने उच्च न्यायालयातही एक याचिका प्रलंबित आहे. अहवाल आणि उच्च न्यायालयाचे निर्देश या दोन्ही बाबींचा विचार करुन मराठवाड्याला पाणी वाटपाचे नियोजन केले जाईल, असे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले.


विरोध करणारे मंत्री कोण?
समन्यायी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी यंदा वेळेत पाणी वाटपाचे नियोजन करावे, अशी आग्रही मागणी केली. जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध करणार्‍या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची नावे सांगा, अशी मागणी अमरसिंह पंडित यांनी केली. यामुळे अहमदनगर आणि नाशिकचे आमदार उठून उभे राहिले.


काय म्हणाले विरोधक
०शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत : जायकवाडीच्या उर्ध्व बाजूला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात 11६ टीएमसी पाणी साठवण्याचे बंधन आहे. प्रत्यक्षात या दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे 165 टीएमसी पाणी अडवले जात आहे.
०शिवसेनेचे दिवाकर रावते : राज्यात जलसंपत्ती नियमन विधेयक 2005 समंत मध्ये झाले. मात्र, कायदा होऊनही सात वर्षात नियम केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात समन्यायी पाणी वाटपाचा गोंधळ निर्माण झाला. नियम होत नाहीत तोवर पाणी सोडू शकत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. 12-६ ग नियमानुसार संबंधित भागात 33 टक्के टंचाई असेल तरच समन्यायी पाणी वाटप करावे, अशी तरतूद करण्यात आली आहे. या नियमामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला कधीच पाणी मिळणार नाही.