आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेक्झिटप्रमाणे जनतेचा कौल मान्य करणार का? उद्धव ठाकरेंचा मोदींना प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटबंदीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटसाठी जनमत चाचणी घेतली गेली. जनतेचा कौल बघून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. मोदी हे तसा निर्णय भारतात घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला. एकूणच शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका करीत शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचा इशाराच दिला आहे. एवढेच नव्हे तर टोकाची भूमिका घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील मनसेच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावुक होण्यात काय अर्थ आहे? सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. नोटबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल. काळ्या पैशाची वसुली करताना पंतप्रधानांच्या मनात काही काळंबेरं आहे का याची शंका येते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. सामान्यांकडून खंडणीसारखा पैसा गोळा केला जातोय. जनतेचे अश्रू तुम्ही का पुसले नाहीत? ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडून आणले त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत, असे सांगून ठाकरे म्हणाले, विजय मल्ल्याने कोणत्या जिल्हा बँकेतून कर्ज काढले होते का? त्याने ज्या बँकेतून कर्ज काढले होते त्या बँकेला मात्र नोटा बदलण्याचे अधिकार कसे काय दिले? सरकारने चलन बदलण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत द्यायला पाहिजे. नाबार्ड या काळात दरवर्षी कर्जवाटप करते. मात्र, या वेळी जाहीर पत्रकार परिषद घेण्यात आली. नोटबंदी आणि या मदतीचा काही संबंध नाही. जनतेने त्रास झाल्यास आक्रोश केलाच पाहिजे.

सेनेबाबत लोकांना विश्वास : जनतेच्या भावना आम्ही सरकारकडे पोहाेचवत आहोत. जनतेच्या भल्यासाठी टोकाची भूमिका घेण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. शिवसेनेत जे येत आहेत त्यांना शिवसेनेबद्दल विश्वास वाटतोय. मी कोणताही पक्ष टार्गेट केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मटाले, चव्हाण सेनेत
नाशिकमधील मनसेच्या आजी, माजी नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे मातोश्रीवर झालेल्या प्रवेश सोहळ्यात मनसेच्या नगरसेविका शीतल भामरे, सुवर्णा मटाले, नगरसेवक गणेश चव्हाण तर शेकापचे माजी नगरसेवक जे.टी. शिंदे यांनी प्रवेश केला. शहरात अनेक नगरसेवकांनी पक्षबदल केले असून सेनेत जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जूनही काही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे.
बातम्या आणखी आहेत...