आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Discussion With Us No Pass The Bill Says Vishwa Hindu Parishad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चा करूनच वटहुकूम काढा, अन्यथा आंदोलन- विश्‍व हिंदू परिषद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष प्रा. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करत त्यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जादूटोणाविरोधी कायदा सर्व घटकांशी चर्चेअंतीच करावा, त्याबाबत तडकाफडकी वटहुकूम काढल्यास आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

आबदेव म्हणाले की, नरबळीविरोधातील तरतुदींना आमचा पाठिंबा आहे. पण, हिंदू धर्मीयांच्या व्रतवैकल्ये, यज्ञ आदी गोष्टींना आडकाठी असू नये. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून हा कायदा अमलात आणावा. सरकारने वटहुकूम काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात आंदोलन करू, असा पवित्रा विश्व हिंदू परिषदेने घेतला.

अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या 84 कोसी परिक्रमा यात्रेवर उत्तर प्रदेश सरकारने बंदी लागू केली असली, तरी ही परिक्रमा करणारच असल्याचे आबदेव यांनी सांगितले. ही पदयात्रा 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या काळात होईल.

त्यानुसार देशभरातील संतमंडळी या यात्रेत सहभागी होतील. अयोध्येकडे प्रस्थान करण्यात अडथळा आणल्यास हे संत स्वत:ला अटक करून घेतील व तिथेच त्यांच्या सभा होतील. ही परिक्रमा उत्तरप्रदेशच्या फैजाबाद, बाराबंकी, गोंडा, आंबेडकर नगर, बस्ती व बहराईच या जिल्ह्यांतून जाणार असून अयोध्येत तिचा समारोप होईल. उत्तरप्रदेश सरकारने परिक्रमेवर बंदी आणून हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या असून हा प्रकार मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी केल्याचा आरोप आबदेव यांनी केला.