मुंबई- राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. विरोधकांची मते फुटल्याने सत्ताधारी भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पक्षाच्या नेत्यांना आता शिवसेनेबिगर आपण सरकार चालवू शकतो असा विश्वास वाटू लागला आहे. तांत्रिक दृष्ट्या मात्र हे शक्य नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभेत सध्या काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. असे असतानाही विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांना 83 ऐवजी 77 मतेच मिळाली. मनसे, समाजवादी पक्ष, शेकाप, एमआयएम सारख्या छोट्या पक्षांनी एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान केले.
महाराष्ट्रात कोविंद यांना 208 मते मिळाली. शिवसेनेची 63 मते यातून वगळल्यास भाजपबरोबर 145 आमदार असल्याचे दिसून येते. बहुमतासाठी सरकारला एवढेच संख्याबळ आवश्यक आहे. शिवसेना सरकारमधुन बाहेर पडल्यास भाजपला सभागृहात आणि राज्यपालांसमोर एवढेच आमदार समोर आणावे लागतील. हे शक्य आहे का? हाच मोठा प्रश्न आहे.
फुटलेल्या मतांबाबतचा निर्णय दिल्लीत : चव्हाण
फुटलेल्या मतांबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, कोणी पाहिलंय कोणाला मत दिलंय. त्यामुळे याबाबतचा दावा पक्क्या स्वरुपात करता येत नाही. याबाबत दिल्लीत निर्णय होईल. भाजप हा शिवसेना संपविण्यासाठी उत्सुक असलेला पक्ष आहे. तर शिवसेना सत्तेसाठी मजबूर आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मते फुटली : तांबे
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना ट्विट करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याचा संशय व्यक्त केला होता. तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, अहमदनगर जिल्ह्यातील विरोधी पक्षांच्या दोन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत दिले.