आजारी पत्नीला वाचविण्‍यासाठी / आजारी पत्नीला वाचविण्‍यासाठी एका महिलेचाच नरबळी, मांत्रिकासह 6 जणांना अटक

दिव्‍य मराठी वेब टीम

Dec 14,2013 03:06:00 PM IST

ठाणे- राज्‍यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 24 तासही होत नाहीत, तोच ठाणे जिल्‍ह्यात नरबळीचा प्रकार उघडकीस आला आहे. आजारी पत्नीला वाचविण्‍यासाठी एका महिलेचाच नरबळी दिल्‍याची घटना वसई येथे घडली आहे. याप्रकरणी बळी देणा-या मांत्रिकासह 6 जणांना अटक करण्‍यात आली आहे.

वसईतील वाळीव गावात हा नरबळीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्राप्‍त माहितीनुसार, ही घटना 17 नोव्‍हेंबरच्‍या आधी घडली आहे. बळी देण्‍यात आलेल्‍या महिलेचा मृतदेह 17 नोव्‍हेंबरला पोलिसांना सापडला होता. महिलेचे शीर धडावेगळे करण्‍यात आले होते. त्‍याचवेळी हा नरबळीचा प्रकार असण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली होती. तपासानंतर हा नरबळीचाच प्रकार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

मृतदेह आढळल्‍यानंतर काही दिवसांनी भिवंडी पोलीस ठाण्‍यात एक मुलगा आई हरवल्याची तक्रार घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला या महिलेचा मृतदेह दाखवला. मृतदेहावरील काही खुणा पाहिल्‍यानंतर हा मृतदेह आपल्‍या आईचाच असल्‍याचे त्‍याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना संबंधित महिलेचा फोन तपासला. तिचा शेवटचा कॉल ट्रेस केल्‍यानंतर पोलिस गुन्‍हेगारांपर्यंत पोहोचले. ती शेवटी कोणास भेटली होती याचाही शोध घेतला. अखेर हा गुन्‍हा उकलण्‍यात यश आले.

राज्‍यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला आहे. याअंतर्गत दाखल होणारा हा पहिलाच गुन्‍हा ठरला आहे.

X
COMMENT