आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाला हृदयविकार असल्याने ती राहिली गप्प; याचाच फायदा घेत पतीने करायला लावले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यात मित्रालाच आपल्या पत्नीवर पतीने वारंवार बलात्कार करायला लावल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण परिसरात घडली असून नितीन पाटील असे त्या विकृत पतीचे नाव आहे. तर नितीन मोगरे असे महिलेवर बलात्कार करणाऱ्या त्याच्या नराधम मित्राचे नाव आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या विकृत पतीसह नराधम मित्रासही अटक केली आहे.

 

पीडित विवाहितेचा 2007 साली नितीन पाटील याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर एकाच वर्षात पीडितेला माहेरुन पैसे आणण्यावरुन पती शिवीगाळ करत होता. मात्र माहेरी भावाला हृदयविकार असल्याने त्याच्या काळजीपोटी मी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही असे पीडितेने सांगितले. 2011 नंतर दोन मुलानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास पतीने भाग पाडले. हे ऑपरेशन झाल्यानंतर मला एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने येथील गोवेली रुग्णालयात तुला नेतो असे सांगून पतीने रस्त्यात मध्येच दुचाकी थांबवली. 

 

यावेळी पतीने त्याचा मित्र नितीन मोगरे यास फोन करुन अगोदरच एका निर्जनस्थळी बोलावून घेतले. त्यानंतर ‘तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या मित्राशी शारीरिक संबंध ठेव, असे सांगितल्याची माहिती पीडितेने दिली. मात्र पीडितेने त्यावेळी प्रखर विरोध केल्यानंतर या दोघांनीही  तिला झुडपात ओढत नेले. त्यानंतर मोगरेने या महिलेवर बलात्कार केला. 

 

याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी महिलेला दिला. यानंतर पुन्हा 2015 रोजी एका लग्न समारंभातून पती समवेत त्याच्या गाडीतून येत असताना, भिवंडी तालुक्यातील पिसा डॅम परिसरात अगोदरच आलेल्या मोगरेने पतीच्या सांगण्यावरुन पुन्हा बलात्कार केला. गतवर्षी गणपती उत्सवादरम्यान पीडितेला तिच्या पतीने संगोडा गावाच्या परिसरातील निर्जन रस्त्यावर नेले. तिथेही मोगरेने तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय सासू-सासरे व नणंद यांनीही किरकोळ कारणांवरुन मानसिक व शारीरिक छळ केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत टिटवाळा पोलिसांनी नराधम मित्रावर बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या पती व त्याच्या नराधम मित्राला अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना कोर्टाने 3 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...