आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटाचे काम बंद करण्याचा डाव उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंगणवाड्यांना पोषक आहार पुरवठा करणार्‍या महिला बचत गटांचे काम बंद करून ठेकेदारांनी उभ्या केलेल्या तीन महिला बचत गटांना ते देण्याचा महिला बालकल्याण विकास विभागाचा डाव मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी हाणून पाडला.

एवढेच नव्हे तर पटनायक समितीने ताशेरे ओढलेल्या त्या तीन महिला बचत गटांचे आहार पुरवठा करण्याचे काम बंद करण्याचे आदेशही उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले. त्यामुळे महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची कोंडी झाली.राज्यातील अंगणवाड्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषक आहाराचा पुरवठा करण्यात येतो. मात्र नवीन नियमावली करण्यात आल्याने राज्यातील ३५० बचत गट बंद पडल्याने याच बचत गटांना पुरवठ्याचे काम पुन्हा देण्याबाबत आमदार दीपकराव साळुंखे, धनंजय मुंडे, किरण पावसकर यांच्यासह चौदा सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

महिला बचत गट बंद पाडण्यासाठी ४१ नियमांची नियमावली केल्याचा आरोप आमदार साळंुके यांनी केला. या योजनेत कंत्राटदारांनी भ्रष्टाचार केला असल्याने त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किरण पावसकर यांनी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही कंत्राटदारांच्या बचत गटांना सांभाळण्यासाठी महिला बचत गटांचे काम बंद करण्यात येत असल्याचा आरोप केला.

महिला बचत गट आणि पूर्वीचे तीन कंत्राटदारांचे बचत गट शासनासाठी सारखेच आहेत असे वक्तव्य महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्याला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ६४ बचत गटांना वर्क ऑर्डर देण्याची पंकजा मुंडे यांनी तयारी दर्शवली मात्र चौकशीबाबत, ठपका ठेवलेल्या ठेकेदारांच्या तीन बचत गटांवर कारवाईबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे अखेर स्वतः उपसभापती वसंत डावखरे यांनी हस्तक्षेप करून ठेकेदार पुरस्कृत बचत गट बंद करण्याचे आदेश सरकारला दिले. तसेच या प्रश्नाबाबत उद्या विधान परिषदेचे सदस्य आणि मंत्र्याची आपल्या दालनात बैठक घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

पंकजा यांचा आक्षेप
बैठक उद्या आहे मग तुम्ही निर्देश आजच कसे देता, अशी विचारणी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपसभापतींना केली. यातील एक कंत्राटदार सकाळपासून विधानभवनात फिरत असल्याचा गौप्यस्फोट करून आता सगळेच सांगू का, अशी विचारणा उपसभापतींनी पंकजा यांना केली.