आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी शाळेत यावे म्हणून महिला आयोगाचे प्रयत्न - विजया रहाटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळांमध्ये मुलींचे कमी असणारे प्रमाण जास्तीत जास्त वाढावे यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करणार असून यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी राज्यभरातील शाळांमध्ये कन्या प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. बीडमधील एका महिलेला तिन्ही मुली झाल्या म्हणून तिच्या सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला आहे. या महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. राज्य महिला आयोग या महिलेच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.

रहाटकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान' सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक मुलीचे स्वागत केले जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, अधिकारी आदींनी किमान एका मुलीला तरी शाळेत प्रथम प्रवेशासाठी अथवा शाळा सोडलेल्या मुलीला पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शाळेत उपयोगी पडेल असे एक तरी साहित्य या मुलींना द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मागास, दुर्गम तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षितभागात हे अभियान अधिक प्रभावीरित्या राबविण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या.

परभणी, नांदेडमध्येही शाळाबाह्य मुली
नंदूरबारमध्ये शाळाबाह्य मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यानंतर गडचिरोली, परभणी, नांदेड, हिंगोलीचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांत जास्तीत जास्त मुलींना शाळेत यावे म्हणून तसेच मुलींचा शाळांमध्ये प्रवेश व्हावा यासाठी आयोग प्रयत्न करणार आहे . नांदेडच्या किनवटला भेट देणार असल्याचेही यावेळी रहाटकर यांनी सांगितले.

महिला आयोगासमोर दीड हजार प्रकरणे
महिला आयोगासमोर महिलांवरील अत्याचाराची विविध दीड हजार प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्या नियमित सुनावण्या सुरू आहेत. या सर्व प्रकरणांची विभागवार सुनावणी घेण्यात येणार असून आहे. भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने पक्षाच्याच एका महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोन सुनावण्या झाल्या आहेत. तसेच नवाब मलिक यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंबाबत वापरलेल्या कथित अपशब्द प्रकरणी सुनावणीही सुरू असल्याची माहितीही रहाटकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...