आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहार पुरवठ्याचे काम ठेकेदारांच्या संस्थांनाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठेकेदारांच्या तीन महिला संस्थांकडील घरपोच आहार पुरवठ्याचे कंत्राट बंद करण्यात यावे, या उपसभापतींच्या निर्देशाची अंमलबजावणी शक्य नसून पूर्वीप्रमाणेच या महिला बचत गटांकडील आहार पुरवठ्याचे काम चालूच राहील, अशी घोषणा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी केली.

मंगळवारी विधान परिषदेत ही लक्षवेधी सूचना चर्चेला आली होती. ६४ महिला बचत गटांना आहार पुरवठ्याच्या कामातून बाद ठरवल्याबद्दल तसेच सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवलेल्या तीन महिला संस्थांना कंत्राट दिल्याप्रकरणी विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच बाद ठरवलेल्या ६४ महिला बचत गटांना वर्कऑर्डर आजच्या आज देण्यात यावी आणि ठेकेदारांच्या तीन महिला संस्थांकडील आहार पुरवठ्याचे कंत्राट बंद करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली होती.

मात्र विरोधी सदस्यांच्या या मागणीस पंकजा मुंडे यांनी ठाम नकार दिला होता. तेव्हा उपसभापती वसंत डावखरे यांनी ठेकेदारांच्या या तीन महिला संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा नाइलाज झाला होता व तशी त्यांनी स्पष्ट नाराजी दर्शवली होती. बुधवारी या प्रकरणी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत निवेदन केले. ‘राज्यातील आहार पुरवठ्याचे काम करणार्‍या सर्व ५५३ प्रकल्पांची तपासणी करण्यात येईल. बाद ठरवलेल्या ६४ महिला बचत गटांना त्वरित वर्कऑर्डर देण्यात येईल. तसेच ज्या तीन महिला संस्थांना कंत्राट देऊ नये असे उपसभापतींनी निर्देश दिले होते, त्यांची अंमलबजावणी न करता या तीन संस्थांचे काम पूर्वीप्रमाणे चालू राहील,’ असे त्यांनी जाहीर केले.

विरोधकांना धक्का
ठेकेदारांच्या तीन महिला संस्थांचे कंत्राट रद्द करण्याचे उपसभापतींनी मंगळवारी निर्देश दिले होते. परंतु या निर्देशांची अंमलबजावणी होणार नाही, असे जाहीर करून पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या मागणीवर विरजण टाकले.