आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला स्वच्छतागृहांसाठी सांगलीकरांचे जनआंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- महिला स्वच्छतागृहांसाठी सांगली जिल्हा सुधार समिती जनआंदोलन उभारणार आहे. यापुढे जाऊन पर्यावरणपूरक स्वच्छतागृह उभारून शासनाला सक्षम पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती सुधार समितीचे निमंत्रक अॅड. अमित शिंदे, प्रा. आर.बी.शिंदे व रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार शंभर लोकांमागे एक स्वच्छतागृह आवश्यक आहे; पण साडेपाच लाख लोकसंख्येच्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात महिलांसाठी केवळ तीनच स्वच्छतागृहे आहेत. जिल्ह्यातील अन्य शहरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. स्वच्छतागृहांअभावी महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषत: भाजीपाला विक्रेत्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. याबाबतचे सत्यशोधन करण्यासाठी नेमलेल्या समितीने अॅड. रमा सरोदे, मुमताज शेख, मीना शेषू, प्रा. नंदा पाटील, प्रा. मेधा पानसरे, प्रा. आर. बी. शिंदे, अॅड. अमित शिंदे, डॉ.विशाल मगदुम यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती अभ्यास करून प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे.

या प्रश्नाबाबत सुधार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवेदन दिले होते. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सत्यशोधन समितीने २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व महिला संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जनआंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
अशी असतील पर्यायी स्वच्छतागृहे
सुधार समितीने स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर केवळ आंदोलन न करता पर्यायी व्यवस्था कशी उभारता येईल, याचाही आराखडा देण्याचे ठरवले आहे. अनेकदा स्वच्छतागृहे बांधण्यासाठी विरोध होतो किंवा अस्तित्वात असलेली पाडण्याचा आग्रह धरला जातो, तो अस्वच्छतेमुळे. स्वच्छतागृहांना पाणीपुरवठा होत नसल्याने दुर्गंधी पसरते आणि त्यांचा वापर होत नाही. यावर उपाय म्हणून सुधार समितीने पथदर्शी पर्यावरणपूरक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी स्वच्छतागृहे प्रशासनाने उभारावीत, यासाठी हे आंदोलन असणार आहे.