आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना मुंबई हायकोर्टाचा दणका, 140 कुटुंब होणार बेघर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील वरळी भागातील कॅम्पा कोला कंपाऊंडच्या रहिवाशांना मुबई हायकोर्टाने दणका दिला आहे. कॅम्पा कोला कंपाऊंडच्या इमारतींचे काही मजले नियमीत करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली असून महापालिकेचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे कॅम्पा कोलाच्या अनधिकृत मजल्यांवर हतोडा पडण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण
मुंबईतील वरळी येथील कॅम्पा कोला कंपाऊंडमध्ये 7 इमारती आहेत. या इमारतींना पाच मजल्यांची परवानगी असताना त्यांनी त्यापेक्षा जास्त मजले बांधले. हे अनधिकृत मजले पाडण्याची नोटीस मुंबई महापालिकेने अनधिकृत फ्लॅटसधारकांना दिली होती. पालिकेने अनधिकृत फ्लॅट्स असल्याने त्या फ्लॅटचे वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शनचे नळ तोडले होते.

त्यानंतर रहिवाशी सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने पाच महिन्यांचा अवधी देत कनेक्शन पुन्हा जोडण्याचे आदेश दिले होते. त्याच बरोबर पाच महिन्यात फ्लॅटस खाली करण्याची सुचनाही दिली होती. तसे प्रतिज्ञापत्र रहिवाशांना देण्यास सांगितले होते. तसेच यापुढे कोणत्याही याचिकेचा विचार केला जाणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.

त्यानंतर कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी काही मजले नियमीत करण्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. ती आज (गुरुवार) फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे 7 इमारतींमधील 140 कुटुंबांना बेघर व्हावे लागण्याची शक्यता आहे. या इमारतींचे पाच मजले अधिकृत असून त्यावरील मजले अनधिकृत असल्याचे पालिकेचे म्हणेणे आहे. वरील मजले पाडत असताना इमारतींना बाधा येणार नसल्याची काळजी पालिकेला घ्यावी लागणार आहे.

पालिकेने रहिवाशांना 2 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी कॅम्पा कोला कंपाऊंडमधील इमारतींवर हतोडा पडण्याची शक्यता आहे.