आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब फाशीवरून रंगले वाक् युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - याकूबच्या फाशीवरून राजकारणही तापले आहे. डाव्या पक्षांचा फाशीला विरोधच आहे. दक्षिणेतील काही पक्षांनी शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकरणांत सरकार व न्यायालये जात- धर्मापलिकडे जाऊन अशीच तत्परता दाखवतील, अशी आशा आहे, असे ट्विट काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले.
आमच्या सरकारने एका व्यक्तिला फासावर लटकवले त्यामुळे मी व्यथित आहे. सरकार पुरस्कृत खून आम्हालाही खून्यांच्या रांगेत उभे करतात. फाशी दिल्याने समस्या संपुष्टात येते याचा कुठलाच पुरावा नाही. हा फक्त बदला आहे. एखाद्या व्यक्तिला निर्दयपणे फासावर लटकवल्यामुळे दहशतवादी हल्ले रोखले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. यावर भाजपने लगेचच पलटवार केला. दिग्विजय सिंह बोलले, ती काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. जर काँग्रेसला सिंहांचे वक्तव्य मान्य नसेल तर त्यांनी तसे निवेदन द्यावे. अन्यथा ही काँग्रेसची अधिकृत भूमिका मानली जाईल, असे भाजप प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा यांनी म्हटले आहे. दरम्यान सिंह व थरुर यांच्या वक्तव्यांशी पक्षाचा संबंध नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा गुन्हेगार याकूब मेमनला गुरुवारी फासावर लटकवण्यात आले. गेल्या ११ वर्षांत एखाद्याला फाशी देण्याची देशातील ही चौथी घटना आहे.

यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल आमिर कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आले होते. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. १४ ऑगस्ट २००४ रोजी पश्चिम बंगालच्या अलिपूर मध्यवर्ती तुरुंंगात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणारा गुन्हेगार धनंजय चॅटर्जीला त्याच्या ४२ व्या वाढदिवशी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर ३० जुलै २०१५ रोजी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टर माइंड याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. वाढदिवसाच्या दिवशीच फासावर चढलेला याकूब हा ११ वर्षांतील दुसरा गुन्हेगार आहे.