आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या संकल्पनेमुळे शेतीमाल थेट परदेशी बाजारात विकता येणार, या 14 पिकांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वर्ल्ड इकाॅनॉमिक फोरमच्या सहकार्याने "व्हॅल्यू चेन' या नव्या संकल्पनेमुळे शेतक-यांचा शेतमाल आता थेट परदेशी कंपन्यांना विकता येणार आहे. त्यात १४ पिकांचा समावेश आहे. राज्य सरकार आणि खरेदीदार कंपन्यांच्या या स्वतंत्र व्यासपीठामुळे पहिल्याच वर्षी राज्यातील १० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
व्हॅल्यू चेन या यंत्रणेमार्फत गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्याला आता आपला माल थेट आंतरराष्ट्रीय बाजारात आणता येईल. ऊस वगळता राज्यातल्या १४ पिकांचा यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दावोसहून परतल्यानंतर तेथील घडामोडींची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरेदीदार कंपन्यांना हव्या असलेल्या दर्जाच्या उर्वरित. पान १२

शेतमालाबाबत थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून आपली मागणी नांेदवता येईल. त्यानुसार काही विशिष्ट प्रतीचे बियाणे आणि तंत्रज्ञान पुरवण्याची गरज असल्यास आणि कंपनीची तशी तयारी असल्यास त्याचीही देवाणघेवाण केली जाणार आहे. यामुळे कंपन्यांची गरज आणि शेतकऱ्यांचा फायदा अशा दोन्ही बाबी यातून साध्य होणार अाहेत.
राज्यात गंुतवणुकीसाठी उत्सुक कंपन्या
शिंडलर : कंपनी राज्यात सरकते जिने तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत.
विझी : टाकाऊपासून कागद बनवण्याचा उद्योग उभारण्याची या अाॅस्ट्रेलियन कंपनीची इच्छा आहे.
जनरल इलेक्ट्रिक : राज्यात तब्बल ३ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित.
हिल्टी ग्रुप : पायभूत सुविधा क्षेत्रात काम करणारी कंपनी.
सॅफरॉन : एअरक्राफ्ट आणि रॉकेट बांधणी क्षेत्रात काम करणारी फ्रेंच कंपनी.
नेस्ले : राज्यात दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक.
टोरे इंटरनॅशनल : टेक्निकल फायबर आणि पॅलिस्टर उद्योगात गुंतवणूक करण्याची इच्छा असलेली परदेशी कंपनी. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या दृष्टीने सरकारबरोबर चर्चा
जे. पी . मॅार्गन : राज्यात १२ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या. आणखी १५ हजार नोकऱ्या उपलब्ध करण्याइतपत गुंतवणूक.

नोमुरा : वित्तीय क्षेत्रात काम करणारी ही जपानी कंपनी मुंबईत फायनान्शियल हब उभारण्यास इच्छुक
मित्सुई : पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणारी जपानी कंपनी

कोरडवाहूलाही फायदा देणार
‘व्हॅल्यू चेन’ योजनेचा या वर्षी राज्यातल्या तब्बल १० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून आगामी वर्षात आणखी २५ लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचा इरादा आहे. ही योजना कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.

अशी आहे शेतीतील मूल्यवर्धित सेवा शृंखला
व्हॅल्यू चेन एक प्रकारे करार शेतीचे विकसित रूप अाहेे. शेती विपणन व्यवस्थेतील ही महत्त्वाची संकल्पना आहे. यात एखाद्या पिकासाठी छोट्या शेतकऱ्यांच्या गटाकडून पिकांचे उत्पादन घेणे, त्या पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध निविष्ठा (खते, बियाणे आदी.) पुरवणे, त्या पिकाची वर्गवारी, त्याचे ग्रेडिंग करणे, त्याची घाऊक विक्री, त्या पिकावर प्रक्रिया, पॅकेजिंग करणे, गरज भासल्यास त्याची अद्ययावत पद्धतीने साठवण करणे व ग्राहकांपर्यंत ते उत्पादन पोहोचवणे यांचा समावेश असतो. ब्राझीलमध्ये कॉफी, दक्षिण अाफ्रिकेत मका आणि जगभरात कापूस या पिकाच्या व्हॅल्यू चेन प्रसिद्ध आहेत. चहा पिकासाठीची व्हॅल्यू चेन फार वर्षांपासून कार्यरत आहे.

उदाहरण : केनियामध्ये युनिलिव्हर कंपनी छोटे छोटे चहा मळे हाताळते, त्यावर प्रक्रिया करते,त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देते. नंतर हा चहा उत्तम दर्जाच्या पॅकेजिंगमध्ये युरोपातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम लिप्टन, ब्रुक बाँड यासारख्या कंपन्या करतात.