आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन- टीव्ही प्रगतीला मारक, पुस्तके वाचा जीवन घडवा- चेतन भगतचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड, पुणे: तंत्रज्ञानामुळे गेल्या दहा-बारा वर्षात जग प्रचंड वेगाने बदलले आहे. हे बदल चांगले आहेत, गरजेचे आहेत. मात्र आजची लहान मुले व युवक स्मार्टफोनमध्ये व टीव्ही पाहण्यात दंग असतात. हे सर्व तुमच्या प्रगतीसाठी मारक आहे. तरूणाईने यश मिळविण्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तके वाचली तरच एकाग्रता, सर्जनशीलता वाढीस लागेल व तुम्ही नव-नव्या कल्पना करू शकाल असा सल्ला लेखक चेतन भगत यांनी दिला.
89 व्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आज दुपारी 1 वाजता चेतन भगत यांची मुलाखत झाली. प्रा. चेतन जोशी व डॉ. यशराज पाटील हे संवादक होते. चेतन भगत यांनी सुरुवातीला अर्धा तास युवकांशी संवाद साधला व त्यानंतर मुलाखत झाली.
तरूणाईशी संवाद साधताना चेतन भगत म्हणाले, मला येथे येऊन खूपच आनंद झाला आहे. मी पाहिलेला भारतातील हा सर्वात मोठा फेस्टिव्हल ( साहित्य संमेलन) आहे. मराठी व महाराष्ट्राबद्दल मला बरेच माहित आहे. मी मुंबईत राहतो. मराठी लोकांना साहित्यात खूप गती आहे, रस आहे. त्यामुळेच हिंदी भाषक लोक अधिक असतानाही हिंदीपेक्षा मराठी पुस्तके अधिक विकली जातात याची मला माहिती आहे. आपण आपली संस्कृती, साहित्य जपले पाहिजे. तसेच दुस-यांच्या साहित्य, संस्कृती, विचाराचा आदर केला पाहिजे. मात्र, अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने वेगळीच कमाल केली आहे. माझ्या लहानपणी मला खूप मोकळा वेळ मिळत असत. आजकालच्या मुलांना मोकळा वेळ आहे पण ते स्मार्टफोन व टीव्हीसमोर घालवत आहेत. आम्ही लहानपणी बोअर व्हायचो. काय करायचे म्हणून इकडे-तिकडे फेरफटका मारायचो, बगीचामध्ये जायचो. त्यातून काहीतरी नविन पाहायचो त्यातून आम्हाला काहीतरी सुचायचे. तुम्ही जेव्हा बोअर होता तेव्हा तुमचे मन रिकामे असते. याचवेळी आपल्याला कल्पना सुचतात यातून आपली सर्जनशीलता बहरत जाते. मात्र आता माहिती तंत्रज्ञानाने मुलांचे विश्व व्यापून टाकले आहे. मुलांना स्वतंत्ररित्या विचार करायला वेळ नाही किंवा ते तसा विचारही करीत नाहीत याचे कारण स्मार्टफोन. या तंत्रज्ञानामुळे मुलाचे भावविश्व हरवून गेले आहे. यातून सावरण्यासाठी काहीतरी करायला हवे. दिवसभरात एक तास तरी काहीतरी वाचले पाहिजे. वाचाल तर परिपक्व व्हाल. यातून वेगवेगळे विचार जन्मला येतात. काही जण लेखक होतात. मी सुद्धा असाच घडलो, अशी आठवण सांगत चेतन यांनी तरूणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.
लेखक समाजाची व लोकांची मते बदलू शकतो असे सांगून चेतन म्हणाले, तुम्ही खूप वाचले तुम्ही तुमची मते बनवू शकता. तुम्हाला चांगले वाईट कळते. अशावेळीही इतरांच्या सल्ल्याची गरज असते. त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याचाही विचार केला पाहिजे. मात्र लोकांचा 100 टक्के मानू नका. ते लोक जे सांगतात ते 100 टक्के खरेही नसते. त्यामुळे तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे, असे सांगून आपल्याला काय आवडते व आपण काय करू शकतो यानुसार निर्णय घ्या असा सल्लाही चेतन यांनी दिला.
जे लोक कष्ट, मेहनत करतात त्यांनाच यश मिळते असे सांगून चेतन भगत म्हणाले, तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करू शकत नाही. तुमच्याकडे प्रश्न उपस्थित करताना त्या त्या समस्येबद्दल उत्तर असायला हवे. एखाद्या व्यक्तीला तु चुकीचा आहे हे सांगण्यापेक्षा तू हे हे केले तर योग्य ठरेल असे सांगायला हवे असेही त्यांनी सांगितले.
आपल्या लेखनाविषयी बोलताना ते म्हणाले, मी आतापर्यंत 6 पुस्तके लिहली. यातील बहुतेक पुस्तकावर चित्रपट बनले आहेत. यातील 5 Point someone आणि 2 state ही पुस्तके ब-यापैकी माझ्या आयुष्याशी निगडित आहेत. थ्री इडियटसमधील चतुर मी आहे. तो राजू व रॅंचो म्हणजे माझ्या दोन मित्रांची खरी कहानी आहे. माझे आयआयटीमधील एका प्राध्यापक मुलीशी अफेयर होते हे खरे आहे व यात कल्पनांचा खूप वापर केला आहे. वास्तवता आणि काल्पनिकता याचा संगम करून मी पुस्तके लिहतो. त्यामुळेच ही पुस्तके भारतातील तरूणांच्या पसंतीस उतरली आहेत, असे त्यांनी सांगितले.
आपण बॉलिवूडमधील चित्रपटाची पटकथा लक्षात घेऊन पुस्तके लिहता की उस्फूर्तपणे लिहता याबाबत चेतन म्हणाले, मी कोणताही साच्यात पुस्तके लिहित नाही. मला जे वाटते तेच लिहतो. मात्र हो मी कल्पनांचा त्यात भरपूर वापर करतो. काही बाबींना टि्वस्ट करावे लागते तरच ते वाचताना मजा येईल. नुसते वास्तववादी पुस्तके लिहल्यास ती फक्त ग्रंथ होतील ती लोकप्रिय व वाचनिय नसतील असे मला वाटते. तसे असते तर एक पुस्तके चालले म्हणून त्याचा सिक्वेल काढू शकलो असतो पण माझा त्यावर विश्वास नाही. त्यामुळे सिक्वेलच्या भानगडीत पडत नाही, ते मला पटत नाही. चेतन भगत यांनी आपल्या हाफ गर्लफ्रेंड व त्यावर येत असलेल्या चित्रपटाबाबत भाष्य केले. थ्री इडियड्स दरम्यान लेखकाच्या हक्कावरून झालेल्या वादाबाबतची माहिती दिली.