आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Writer For Blind Students Education Minister Tawade

अंध विद्यार्थ्यांना लेखनिक; १० वी, १२ वी परीक्षेसाठी निर्णय- शिक्षणमंत्री तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा देणा-या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची मुभा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीचा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीचा विद्यार्थी लेखनिक म्हणून मिळू शकेल; परंतु सध्या लेखनिक उपलब्ध होत नाहीत, कारण इयत्ता ९ वी आणि ११ वीचे विद्यार्थी स्वत:च्या अभ्यासात व्यग्र असतात. त्यामुळे ही अट शिथिल करण्याचा विभागाचा विचार आहे, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
कोकुयो- कॅम्लिनच्या वतीने गुरुवारी मुंबईत मुख्याध्यापक दिवस (प्रिन्सिपल-डे) शिक्षणमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. ‘लेखनिकासाठी महाराष्ट्रात किमान १५०० प्रामाणिक व्यक्ती शोधण्यात याव्यात, या व्यक्ती अंध विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिका लिहितील. अशा प्रामाणिक व्यक्तींचा एक संच स्थापन करण्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत ही कार्यवाही करण्यात येईल,’ असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
मुख्याध्यापक हे शिक्षण व्यवस्थेमधील कर्णधाराची भूमिका बजावत असतात. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य मुख्याध्यापक करत असतात, त्यामुळे मुख्याध्यापकांनी प्रशासकीय कामाऐवजी शैक्षणिक कामाकडे जास्तीत लक्ष द्यावे, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कॅम्लिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुंबई जॅपनीज स्कूलचे मुख्याध्यापक तोमोआकी नेमोतो आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनविशेष कमी करणार
शैक्षणिक वर्षामध्ये वर्षातील ५२ दिवस हे दिनविशेष दिवस म्हणून साजरे करण्यात येतात. या दिवसांमध्ये होणा-या परिपाठामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे दिवस वाया जातात, असे निदर्शनास आले आहे, त्यामुळे भविष्यात हे दिवस कमी करून या दिवसांची रचनात्मक मांडणी करण्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत असल्याचे तावडे यांनी सांगितले.

अभ्यासक्रम ब्रेल लिपीतून
शासकीय शाळांमधील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाऐवजी त्यांना अंध शाळांमधील अभ्यासक्रम ब्रेल लिपीमध्ये देण्यात यावा, असा विभागाचा मानस आहे. ‘नॅब’सारख्या संस्थांशी चर्चा करून त्या विद्यार्थ्यांना सुलभ होईल, असा अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.