आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Hanging Destroy Mumbai Blast Evidence Prakash Ambedkar

याकूबला अात्ताच फाशी दिल्यास दुवे नष्ट होतील, प्रकाश आंबेडकर यांची चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील इतर आरोपी अद्याप हाती लागलेले नसताना याकूब मेमनच्या फाशीच्या अंमलबजावणीस मोदी सरकार अकारण घाई करत अाहे. याकूबला अाताच फाशी दिल्यास या बॉम्बस्फोटातील अनेक दुवे कायमचे नष्ट होतील, असा दावा करत भारिप अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी याकूबला इतक्यात फाशी देऊ नये, अशी मागणी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मेमन बंधूंनी केलेल्या बॉम्बस्फोटांना १९९३ च्या मुंबई दंगलीची पार्श्वभूमी होती. आजपर्यंत या बॉम्बस्फोटातील केवळ मुस्लिम आरोपी पकडले गेले आहेत. यातील राजकीय नेते आणि हिंदू धार्मिक नेते यांची भूमिका पुढे आली नाही. त्या सर्वांची माहिती असणारा याकूब एकमेव आहे. त्यामुळे त्याला इतक्यात फाशी देऊ नये, असे आंबेडकर म्हणाले. याकूबने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. यावरून त्याच्याकडे १९९३ च्या बॉम्बस्फोटसंदर्भात अधिक माहिती असली पाहिजे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याकूबची उपयुक्तता संपलेली नाही. म्हणून याकूबला फाशी देण्याची ही योग्य वेळ नसल्याचा दावा अॅड. आंबेडकर यांनी केला.

न्यायव्यवस्थेने याकूबला फाशी देऊन आपले चोख काम पार पाडले आहे. न्यायालयाच्या शिक्षेची अंमलबजावणी जरूर व्हावी, पण देशांतर्गत परिस्थिती पाहून फाशीच्या शिक्षेचा राजकीय निर्णय व्हायला हवा, असेही आंबेडकर म्हणाले.

जालना, मालेगाव, पुण्यातील फर्ग्युसन रोड आणि मुंबईतील गिरगाव बॉम्बस्फोटात हिंदू आराेपी असल्याने याचा तपास थांबला, असा दावा करत भारतात फाशीच्या शिक्षेत ८० टक्के आरोपी अादिवासी, दलित व मुस्लिम आरोपीच कसे, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

वैदिक मानसिकता
वैदिक धर्मात मृत्युदंडाची शिक्षा तळातील जातीला देण्यात येते. त्यामुळेच मोदी सरकार याकूब मेमनला फाशी देण्यास उतावीळ झाल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.

लोकप्रिय निर्णय
अफझल गुरूला फाशी देताना ‘यूपीए’ सरकारने लोकप्रिय निर्णय घेतला. तीच पद्धत मोदी सरकार अवलंबत असून याकूबला फाशी देऊन भाजप सरकार शौर्य दाखवू पाहत असल्याची टीका अॅड. आंबेडकर यांनी केली.