एखाद्या गुन्हेगाराला फासावर चढवण्यापूर्वी कारागृह प्रशासनाला अनेक बाबी तपासाव्या लागतात. याकूबच्या बाबतीहीही ही प्रकिया पार पाडण्यात आली आहे. याकूबच्या फाशीचा डेथ वॉरंट जारी झाल्यापासून दररोज दिवसातून तीनवेळा त्याच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. ३० जुलैच्या पूर्वसंध्येला एक डॉक्टराच्या चमूने याकूबच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या. या तपासणीत याकूबची प्रकृती सुदृढ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेयो) डॉक्टरांचे एक पथक कारागृहात दाखल झाले. या पथकासोबत एक एक्स-रे मशीन आणि वैद्यकीय उपकरणे होती. एक्स-रे मशीनचा उपयोग फाशी दिल्यानंतर करण्यात येईल.
तुपात भिजवलेला दोर
याकूबच्या फाशीसाठी दोर आले आहेत. फाशीसाठी वापरण्यात येणारे दोर हे मेण आणि तुपात भिजवून तयार केलेले असतात. याकूबच्या फाशीसाठी बिहार येथील बक्सर कारागृहातून दोर मागवण्यात आले आहे.
जल्लाद दाखल
या फाशीसाठी पुणे येथील येरवडा कारागृहातून एक जल्लाद नागपूर कारागृहात दाखल झाला आहे. या जल्लादविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. परंतु या जल्लादने अजमल कसाबलाही फाशी दिली होती, अशी चर्चा आहे. या जल्लादने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील काही कर्मचा-यांना प्रशिक्षणही दिले.
पंधरा दिवसांपासून सराव
याकूबच्या फाशीसाठी नागपूर कारागृहात १५ दिवसांपासून सराव करण्यात येत आहे. त्यासाठी याकूबच्या वजनाएवढा पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्याला दररोज सकाळ संध्याकाळी फाशी देऊन सराव केला जात होता.
२३ लाखांचा हॅगिंग शेड
पावसामुळे किंवा हवेतून हल्ला होण्यापासून वाचण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात २२ लाख ९० हजार रुपये खर्च करुन हॅगिंग शेड आणि कठडा तयार करण्यात आला आहे. हॅगिंग शेड हा फाशी यॉर्डसमोर आहे. गृह विभागाने हॅगिंग शेडच्या खर्चाला मान्यता दिली.
पुढे वाचा, न्यायव्यवस्थेवर विश्वास : सुलेमान