आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनचा अाज फैसला; फाशी तर होणारच, तीही ३० जुलैलाच?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील फाशीची शिक्षा झालेला आरोपी याकूब मेमनने अापला जीव वाचवण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून राज्यपालांकडे सादर केलेल्या दया अर्जावर शनिवारी निर्णय हाेणार अाहे, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. गृह विभागाने याबाबतचा आपला अहवाल शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. त्यानंतर सायंकाळीच मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव (सुरक्षा) विजय सतबीरसिंग यांना अापल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाेलावून याबाबत गाेपनीय चर्चा केल्याची माहिती अाहे.
याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. न्यायालयाने ही शिक्षा ठाेठावल्यानंतर याकूब मेमनतर्फे त्याच्या भावाने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला हाेता. मात्र, राष्ट्रपतींनी ताे फेटाळला. त्यानंतर याकूब मेमनने महाराष्ट्राचे राज्यपालचे सी. विद्यासागर राव यांच्याकडे दया याचिका दाखल केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले, ‘याकूबची दया याचिका सोमवारी आमच्याकडे आली. जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त पानांच्या या याचिकेवर आम्ही सगळे दोन दिवस अभ्यास करीत होतो. शुक्रवारी अभ्यास पूर्ण करून आम्ही आमच्या अभिप्रायासह मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाइल पाठवली आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री फाइलवर सही करून रात्रीच वा शनिवारी सकाळी राज्यपालांकडे फाइल पाठवतील. त्यानंतर राज्यपाल आपला निर्णय जाहीर करतील.’
दया अर्जामध्ये याकूब मेमनने अापण आजारी असल्याचे म्हटले अाहे. तसेच या खटल्यातील इतर आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने माझ्याही शिक्षेचा विचार व्हावा आणि जन्मठेपेच्या शिक्षेपैकी २१ वर्षे अापण तुरुंगात काढल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याच्या या सर्व मुद्द्यांचा तसेच राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या दया याचिकेचा अभ्यासही यासाठी आम्ही केला आहे. याकूब मेमनने जे जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या सर्व मुद्द्यांचे खंडन केले असून १९९३ च्या बॉम्बस्फोटापासून ते टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली तोपर्यंतचे मुद्दे आम्ही सविस्तर मांडून अहवाल तयार केला आहे, असेही या गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
फाशी तर होणारच, तीही ३० जुलैलाच?
‘समजा राज्यपालांनी दया याचिका स्वीकृत केली तर पुन्हा फाशीची सर्व प्रक्रिया पहिल्यापासून सुरू करावी लागणार का?’ असे विचारता गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले ‘राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला असल्याने आता बदल होणार नाही. केवळ वेळकाढूपणा करण्यासाठीच याकूबने दया अर्जाचा खटाटाेप केला. मात्र त्याला यश मिळणार नाही. नागपूरमध्ये आम्ही फाशी देण्याची सर्व तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्याचे कुटुंबीयही त्याला भेटले आहे. त्यामुळे याकूबला फाशी होणारच,’ असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, याकूबला ३० जुलैलाच फाशी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.