आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंब पावसात रंगला याेग; मंत्री, अधिकारी, पाेलिस, तरुणाईचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आयाेजित याेग कार्यक्रमात सहभाग नाेंदवला. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आयाेजित याेग कार्यक्रमात सहभाग नाेंदवला.
मुंबई - पहिल्यावहिल्या जागतिक योग दिनाचा मुंबईकरांमध्ये रविवारी अमाप उत्साह पाहायला मिळाला. शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये, उद्याने आणि मैदांनावर जागोजागी योगाचे कार्यक्रम पार पडले. यामध्ये विद्यार्थी, मंत्री, लोकप्रतिनिधी, पोलिस, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

नरिमन पाॅइंटच्या प्रोमेनेडवरती समुद्राच्या लाटांशेजारी मुंबईतील सर्वात मोठ्या योग दिनाचा सोहळा झाला. या वेळी केंद्रीय कोळसा, ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजप प्रवक्त्या शायना एनसी उपस्थित हाेत्या. खुल्या आकाशाखाली सकाळी -सकाळी झालेल्या या योग कार्यक्रमास दक्षिण मुंबईतील तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. या वेळी पावसाने हजेरी लावली, परंतु भरपावसातही योगाचा कार्यक्रम पार पडला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विलपार्लेमधील दीक्षित रोडवरील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांसमवेत योगाचे धडे गिरवले. या वेळी त्यांच्यासमवेत विद्यार्थी, पालक आणि िशक्षकांनीसुद्धा योगासने केली.

मध्य रेल्वेने योग दिनाचे आयोजन केले होते. सेंट्रल रेल्वेच्या आॅडिटोरियममध्ये झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक सुनीलकुमार सूद जातीने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास रेल्वे कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. योग प्रशिक्षक भारत छावडा यांनी उपस्थितांना योगाचे धडे िदले. राजभवनात ब्रह्माकुमारी दिव्यप्रभा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी योग ध्यानधारणा केली. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीचे अतिरिक्त महासचिव ब्रह्माकुमार रमेश, माउंट अबू येथील ब्रह्माकुमारी मुख्यालयातून आलेल्या ब्रह्माकुमारी उषाबेन, ब्रह्माकुमारी रुक्मिणी, ब्रह्माकुमारी वंदना व इतर निमंत्रित उपस्थित होते.

‘परमात्म्याशी याेगातून संबंध’
योग ही तन, मन आणि आत्मा यांचा समयोग साधणारी क्रिया आहे. आज युवकांना इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी ‘कनेक्ट’ राहायला आवडते. त्याचप्रमाणे राजयोग क्रियेच्या माध्यमातून परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करता येतो, असे प्रतिपादन राज्यपालांनी राजभवनातील योग कार्यक्रमात केले.

घराघरांतही योग
योगाचे साहित्य खरेदी करण्यात मुंबईकर देशात तिसर्‍या क्रमाकांवर आहेत. त्याची प्रचिती रविवारी िदसून आली. मुंबईकरांनी उद्याने, खेळाची मैदाने अशा ठिकाणी उत्स्फूर्तपणे योग दिनास हजेरी लावली होती, तर अनेकांनी रविवारच्या सुटीची संधी साधत टीव्ही पाहत घरच्या घरी योगाचे धडे गिरवले.

पोलिस जिमखान्यातही आसने
मरीन ड्राइव्ह आणि नायगावच्या पोलिस जिमखान्यात पोलिसांनी सामूहिकपण योगाची आसने केली. मरीन ड्राइव्हला ३००, नायगावला २००, तर मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्रातील योग कार्यक्रमात ७०० पोलिस सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...