आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानीचा घोटाळा ‘आप’ उचलणार-योगेंद्र यादव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कृष्णा- गोदावरी (केजी) खो-यामधील रिलायन्स गॅस प्रकल्पात यूपीए सरकारने केलेला घोटाळा भारतातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी हाच मुद्दा प्राधान्याने उचलणार असल्याचे पक्षाचे मुख्य सल्लागार आणि नेते योगेंद्र यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कृष्णा-गोदावरी प्रकल्पातील गॅसच्या किमती यूपीएच्या सरकारने वाढवून दिल्या. त्यामुळे रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांना मोठा फायदा झाला. केंद्रात विरोधी पक्ष असणा-या भाजपने रिलायन्सच्या घोटाळ्याकडे कानाडोळा केला, असा आरोपही त्यांनी केला. देशात तिसरी आघाडी अस्तित्वात नाही. डाव्या पक्षांनी केरळ आणि बंगालमध्ये प्रस्थापितांचे राजकारण केले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला डावे पक्ष पर्याय होऊ शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
महाराष्‍ट्रातील दोन्ही सत्ताधारी पक्ष आणि तिन्ही विरोधी पक्ष एकच आहेत.या पक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल दिली असून हेच प्रश्न ‘आप’ आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उचलणार आहे. तेलंगणचा मुद्दा कॉग्रेससने दहा वर्षे धुमसत ठेवला.त्यातून स्थानिकांना झुंजवत ठेवले असा आरोप करत काँग्रेसच्या या राजकारणावर त्यांनी कडाडून टीका केली. मोदी भ्रष्टाचाराचा मुद्दा नेहमी उचलतात, मात्र रिलायन्सच्या घोटाळ्याबद्दल त्यांच्या तोंडून ब्र शब्दही का नाही, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला.
देशातील लोकसभेच्या 546 जागा लढवण्याची इच्छा आहे. पण, आमची तेवढी ताकत नाही, अशी कबूली देतानाच ‘आप’ उद्योगांच्या विरोधात नाही, तर त्यातील भ्रष्टाचाराविरोधात आहे, असे यादव यावेळी म्हणाले.
भ्रष्‍ट्राचाराचे प्रतीक
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून अंजली दमानिया पुढे आल्या आहेत. त्यामुळे गडकरींविरोधात त्यांना उमेदवारी दिल्याचा खुलासा त्यांनी केला.
अण्णांनी टीका करावी
अण्णा हजारे ‘आप’चे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी केलेल्या टीकेतून आम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे अण्णांनी आमचे अवश्य कान पिळावेत, असे यादव म्हणाले.