आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Your Government\' Dedicated Web Portal Of Maharashtra Government

जनसेवेत आपले सरकार : सर्वसामान्यांचा मंत्रालयात खेटे मारण्याचा त्रास कमी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एखाद्या सरकारी कार्यालयात खेटे घालून पादत्राणे झिजतात, मात्र काम काही होत नाही... हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलेला असतो. मात्र, आता एखाद्या विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी तुमचे काम करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याची तक्रार थेट संबंधित मंत्र्यांच्या किंवा वरिष्ठ अधिका-यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राज्य सरकारच्या एखाद्या निर्णयाबाबत अथवा धोरणाबाबत काही सूचना तुम्हाला करायच्या असतील तर एक हक्काचे व्यासपीठही उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाने आता "आपले सरकार' नावाचे एक वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही थेट मंत्रालय स्तरावर दाद मागू शकता.
नागरिकांना सरकारी प्रशासकीय पातळीवर काही अडचणींचा सामना करावा लागत असतो. बऱ्याचदा त्यांच्या तक्रारीचे निराकरण हे स्थानिक कार्यालयाकडून होत नाही. त्या वेळी त्यांना मंत्रालयात धाव घ्यावी लागते. या प्रक्रियेत वेळ, पैसा आणि शारीरिक श्रम खर्ची होतात. मात्र, आता या कटकटीतून सुटका करून देण्यासाठी सरकारने "आपले सरकार' उपलब्ध करून दिले आहे. या वेब पोर्टलद्वारे नागरिकांना तक्रारी दाखल करणे तसेच त्याची सद्य:स्थिती जाणून घेण्याकरिता मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही.

तक्रारीसाठी प्रक्रिया
नागरिकाने एखाद्या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना त्याविषयीचा टोकन क्रमांक मिळेल. त्या क्रमांकाचा वापर करून तक्रारीची सद्य:स्थिती पोर्टलवर जाणून घेता येईल. सर्वसाधारण सार्वजनिक सेवा, सर्व मंत्रालयीन विभागांचे कामकाज याविषयीच्या तक्रारी या वेब पोर्टलवर नोंदवता येतील. त्याचबरोबर सर्व विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यालयांचा समावेशही वेब पोर्टलवर लवकरच करण्यात येणार आहे. या पोर्टलवर नागरिकांना तक्रारी मोबाईल क्रमांक आणि ई-मेलचा वापर करून ऑनलाइन नोंदवता येतील. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची ई-पोचही मिळणार आहे.

21 दिवसांची मुदत
नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कमाल २१ दिवसांची मुदत देण्यात आली अाहे. ही कमाल मर्यादा लवकरच सात दिवसापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. आपले सरकारच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण झाल्यानंतर नागरिकाला संदेश प्राप्त होऊन त्याबाबत अभिप्रायही मागवले जातील.

माहितीचा अधिकार
एखाद्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करता येईल. त्याचे शुल्क इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांचा वापर करून अदा करता येईल.

व्यवस्थापन :
प्रत्येक विभागासाठी एक जबाबदार अधिकारी नेमण्यात येणार असून या अधिकाऱ्याकडे या पोर्टलवरील त्या विभागाच्या तक्रारीचे निवारणाच्या कामकाजाचे संनियंत्रणाची जबाबदारी.
सहयोग :
तक्रारीसोबतच नागरिकांचा प्रशासनात सहभाग वाढवण्याकरिता जनतेकडून शासनाच्या एखाद्या धोरणाबाबत सूचना किंवा अभिप्राय मिळवण्याकरिता पोर्टलच्या या भागाचा उपयोग येईल.

हे मात्र टाळा
न्यायप्रविष्ट प्रकरणे, वैयक्तिक आणि कौटुंबिक विवाद जे तालुका, उपविभाग, जिल्हा स्तरावरील योग्य प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आलेले नाहीत तसेच माहिती अधिकारासंबंधी अर्ज याबाबतच्या तक्रारी वेब पोर्टलवर दाखल करता येणार.