मुंबई - राज्यातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने एक भन्नाट कल्पना समोर आणली आहे. महानगरी मुंबईत येणार्या तमाम लोकांचे आकर्षण असलेल्या फिल्मसिटीचा फेरफटका मारण्यासाठी महामंडळाने थेट ‘बॉलिवूड टुरिझम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामुळे मुंबई व राज्याच्या पर्यटन महसुलात वाढ होऊ शकेल.
बॉलिवूडबद्दल कुतूहल नाही असा माणूस क्वचितच सापडेल. परंतु चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील फिल्मसिटीत जाण्यास आतापर्यंत सर्वसामान्यांना मज्जाव होता. चित्रपटनगरी या लोकांसाठी खुली करावी ही गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पाहता आता फिल्मसिटीशी करार झाल्यामुळे बॉलिवूड टुरिझम ही संकल्पना खर्या अर्थाने साकार झाली असल्याचे ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी, अर्थात फिल्मसिटीबरोबर संयुक्त सहकार्य करून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने हा प्रकल्प राबवला आहे.
यासाठी महामंडळाने पर्यटन संस्थांकडून स्वारस्यपत्रे मागवली होती. त्यानुसार आता मल्टीलिंक आणि ट्रॅव्हलमार्टइंडिया.कॉम प्रा.लि. या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. महामंडळाच्या 20 जानेवारीला साजरा होणार्या वर्धापनदिनापासून हा बॉलिवूड टुरिझमचा आनंद लुटता येणार आहे.
पाहा आणखी बरेच काही
बांद्रा हिल्स, बॉलिवूड गल्ली, बॉलिवूड म्युझियम, बॉलिवूड कॅफे, कॉस्च्युम गॅलरी. स्पेशल इफेक्टच्या क्लृप्त्या, सेलिब्रिटी कुठे राहतात तेही. इतकेच नाही तर चित्रीकरणासाठी वापरण्यात येणार्या तंत्रज्ञानाचा एक भाग होण्याची संधी.
असे ठरवा पॅकेज
हिट 499
हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाइड घडवणार तीन तासांची सफर
सुपरहिट 1,999
हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाइड घडवणार चार ते पाच तासाची सफर
ब्लॉकबस्टर 3,250
हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाइड घडवणार सहा ते सात तासांची सफर