मुंबई - मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मंत्रालयात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा गुरुवारी प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. व्ही. पिल्लई असे तरुणाचे नाव असून मुंबईतील मालाड पश्चिम येथील रहिवासी आहे.
एसआरए प्रकल्पात पिल्लई याला घर देण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, आपल्या दोन झोपड्या असल्याने दोन घरे द्यावीत, अशी त्याची मागणी होती. याबाबत त्याने सर्व संबंधितांशी पत्रव्यवहारदेखील केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातदेखील त्याने पत्रव्यवहार केला होता. गुरुवारी तो मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्रालयात आला. मात्र, मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर असल्याने भेटू शकत नाहीत, असे सांगिल्यानंतर त्याने मुख्य लॉबीत येऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, त्याने स्वत:ला पेटवण्याआधीच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मंत्रालयात प्रवेश करताना पोलिस तपासणी करत असतानाही त्याने रॉकेल आत आणले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पिल्लई याला मरिन लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले. वर्तमानपत्रात लपवून त्याने रॉकेलची छोटी बाटली आणली होती. वर्तमानपत्र गोल केलेले असल्याने त्यात काय आहे याकडे पोलिसांनी लक्ष न दिल्यानेच रॉकेलची बाटली पिल्लई मंत्रालयात घेऊन जाऊ शकला.