आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणच घडवतील सामाजिक बदल- 'आयआयटी'च्या कार्यक्रमात पंतप्रधानांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिशील करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे लक्षात घेऊन देशातील तरुणांनी पुढे आले पाहिजे. तुमची पिढी देशात आर्थिक आणि सामाजिक बदल घडवू शकते, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी आयआयटी, मुंबई येथे पार पडलेल्या 50 व्या पदवी प्रदान समारंभामध्ये व्यक्त केला.
राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मानव विकासमंत्री कपिल सिब्बल, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्ष अनिल काकोडकर आणि संस्थेचे देवांग खकार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विप्रो समूहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना डॉक्टरेट ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आले.
गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था थोडी धीमी झाली असली तरी पुन्हा 8 ते 9 टक्के वाढीचा दर मिळवणे अशक्य नाही. त्यासाठी अर्थातच देशाला कुशल अशा इंजिनिअर्सची गरज आहे. केवळ राजकारण, सिनेमा किंवा क्रीडा क्षेत्रातून नव्हे तर इंजिनिअरिंग आणि विज्ञान क्षेत्रातूनही देशाला नेतृत्व मिळायला हवे, पंतप्रधानांनी सांगितले. देशातील उच्च शिक्षणाच्या सद्य:स्थितीबाबत ते म्हणाले की, दरवर्षी शेकडो विद्यार्थी चांगल्या संस्थांमध्ये अर्ज करतात, पण र्मयादेमुळे सगळ्यांना प्रवेश मिळत नाही त्यावेळी मला दु:ख होते. त्यामुळेच आमच्या सरकारने उच्च शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी विविध निर्णय घेतले. नवीन आयआयटी आणि आयआयएमची घोषणा केली. तसेच शालेय शिक्षणामध्येही गुंतवणूक वाढवली. मागासवर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू केल्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ शिक्षण मिळावे म्हणून देशाच्या विविध भागांमध्ये संस्था सुरू करण्यात आल्या. मात्र हे सर्व करतानाही आज देशापुढे संशोधन क्षेत्रात आणखी चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे. अशा वेळी आयआयटी मुंबईने संशोधनाला दिलेले प्राधान्य ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.
मनुष्यबळाचा योग्य वापर हवा- विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी आपल्या विकसनशील देशाला उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. तसेच उच्च शिक्षणात सध्या सुरू असलेल्या मोठय़ा गुंतवणुकीचे फळ म्हणजे देश बांधणी व विकासासाठी त्याचा फायदा व्हायला हवा, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंडित नेहरूंचे स्वप्न पूर्ण करा- आयआयटीचे विद्यार्थी कायमच सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असतात आणि त्यांच्या हुशारीची दाद द्यायला हवी, असे कौतुक केंद्रीय मानव विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केले. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आयआयटी स्थापनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना अधिक संधी आणि संशोधनावर भर द्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी पदवी घेऊन बाहेर पडताना आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल, याचा विचार करायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक संधी निर्माण करणे हे आता सरकारचे काम असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात आयआयटीच्या 2006 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली असून त्यामध्ये 175 पीएचडीचे विद्यार्थी आहेत. यावेळी तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आले.
चुका करा, पण मूल्ये विसरू नका : अझीम प्रेमजी- डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विप्रो समूहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी बिनधास्त चुका करण्याचा सल्ला दिला. आयुष्यात चुका केल्याशिवाय आपण काही शिकत नाही आणि नवीन प्रयोग करत नाही. मात्र, जे काम कराल ते आत्मविश्वासाने, उत्तम पद्धतीने करायला हवे. तसेच आयुष्यात आपली मूल्ये कधीच विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.