आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Zadipatti Issue, Marathi Actor, Training Institute

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाडीपट्टीतील कलाकारांना प्रशिक्षण देणारी संस्था उभारावी; सदानंद बोरकर यांची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शासनाचे नेहमीच झाडीपट्टीकडे दुर्लक्ष राहिले आहे. या माध्यमातून काम करणार्‍या कलाकारांना प्रशिक्षण देईल, अशी एक चांगली संस्था उभारण्याची गरज मला वाटते. त्याचप्रमाणे नाट्यगृहांचा मोठा प्रश्न विदर्भात आहे, शासन नाट्यगृह उभारते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा तालुक्यांच्या गावी. मात्र, जिथे खरा प्रेक्षक आहे अशा झाडीपट्टीच्या पट्ट्यांत नाट्यगृहे उभारली गेली तरच या संस्कृतीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होईल, असे प्रतिपादन झाडीपट्टीचे गावोगाव सादरीकरण करणारे सदानंद बोरकर यांनी व्यक्त केले. दिवगंत वसंत सोमण पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी नम्रता भिंगार्डे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सदानंद बोरकर यांनी झाडीपट्टीबद्दलची अतिशय रोचक अशी माहिती प्रेक्षकांना सांगितली. आमचा प्रेक्षक इतका नाटकवेडा आहे की नाटकाला फ्री पासेस मागण्याची पुण्या-मुंबईकडची पद्धत अजिबात नाही. त्यामुळे एकेका नाटकाचे बुकिंग 1 ते 4 लाखांपर्यंत जाते. ‘तो मी नव्हेच’ या नाटकासाठी पहिल्यांदा फिरता रंगमंच तयार झाला आणि तसाच रंगमंच नवरगावातही तयार करण्यात आला. या फिरत्या रंगमंचावर बोरकर यांनी 500 हून अधिक प्रयोग केले, अशा अनेक गमतीजमती त्यांनी या वेळी सांगितल्या. रोख रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा वसंत सोमण स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर, कमलाकर नाडकर्णी, सुरेश खरे, वामन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

माझं कुंकू मीच पुसलं एम.ए. अभ्यासक्रमात
प्रामुख्याने झाडीपट्टी रंगभूमीसाठी सदानंद बोरकर यांनी लिहिलेले ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाची संहिता यंदा एम. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आलेली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरील बोरकर यांच्या ‘आत्महत्या’ या नाटकाचे ‘द हिंदू’ चे माजी संपादक पी. साईनाथ यांनी कौतुक केले परिणामी केरळ येथे झालेल्या सार्क महोत्सवात झाडीपट्टीतील या नाटकाने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह कलाकारांची मोठी उपस्थिती होती.

दिलीप प्रभावळकरांची कौतुकाची थाप
झाडीपट्टी मला वाचून माहीत होती. मात्र, सदानंद बोरकरांनी जे काही सांगितले त्याने मी भारावून गेलो आहे. तसेच त्यांचे या क्षेत्रातील कार्य हे अतिशय भरीव आहे, अशा शब्दांत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनीही बोरकर यांची या पुरस्कारासाठी निवड योग्य असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.