आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. झाकीरच्या पत्रकार परिषदेला जागा मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पत्रकार परिषद घेण्यास जागा न मिळाल्याने वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक याची इंटरनेटद्वारे होणारी बहुचर्चित पत्रकार परिषद पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून नाईकच्या पत्रकार परिषदेसाठी जागा देण्यासच अनेक हॉटेल्स तसेच सभागृह व्यवस्थापनांनी नकार दिला आहे. परिणामी, तिसऱ्यांदा ही पत्रकार परिषद रद्द करण्याची नामुष्की इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या व्यवस्थापनावर ओढवली.
गुरुवारी सकाळी इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या पत्रकार परिषदेची तयारी करण्यासाठी नाईकच्या संस्थेचे कार्यकर्ते बुधवारी रात्री आग्रीपाडा परिसरातील मेहफिल हॉल सभागृहात पोहोचले. मात्र, तेथील व्यवस्थापनाने सभागृह देण्यास नकार दिल्याने आम्हाला ही पत्रकार परिषद रद्द करावी लागत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. पत्रकार परिषद सर्वात आधी मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि त्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या क्षणी संबंधित व्यवस्थापनांनी नकार दिल्याने ही परिषद रद्द करावी लागली. पोलिसांनी दक्षिण मुंबईतील सर्वच हॉटेल्स आणि सभागृह व्यवस्थापनांना आम्हाला जागा देऊ नये, अशा सूचना दिल्याचा आरोप आयोजकांनी केला अाहे. दरम्यान, डाॅ. नाईक शुक्रवारी पुन्हा इंटरनेटच्या माध्यमांतून पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येते.
तपास यंत्रणा सतर्क
झाकीर नाईकच्या चिथावणीखोर आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांपासून प्रभावित झाल्याची कबुली बांगलादेशातील अतिरेकी हल्ल्यातील दोन हल्लेखोरांनी दिल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एनआयए आणि मुंबई पोलिस अशा दुहेरी स्तरावर सध्या झाकीर नाईकच्या उपलब्ध असलेल्या प्रचार साहित्याची कसून तपासणी सुरू आहे. यापूर्वीही राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांत नाईकविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन सध्या परदेशात असलेल्या नाईकने भारतात परतण्याचा आपला बेत रद्द केला आहे.
बातम्या आणखी आहेत...