आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 13 जिल्ह्यांना ‘झिका’चा धाेका, अशी आहेत अाजाराची लक्षणे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई- झिका हा आजार जगात सर्वत्र पसरत असून हा विषाणू गरोदर मातांसाठी अतिशय घातक ठरत अाहे. त्याचा परिणाम होऊन नवजात बालकाच्या डोक्याचा घेर कमी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत राज्यातील स्थितीचा अाढावा घेऊन १३ सरकारी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचा इशारा अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी दिला अाहे.
 
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, अमरावती, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया, जालना, परभणी, एम. एच. उल्हासनगर, लातूर, नांदेड, डागा स्त्री रुग्णालय नागपूर, उस्मानाबाद यांच्यासह जिल्हा रुग्णालय नाशिक, सातारा व रत्नागिरी यांना सतर्क करण्यात आले आहे. नवजात बालकाच्या डोक्याचा घेर ३१ सेंमीपेक्षा कमी आढळल्यास आढावा घेऊन दर सोमवारी साप्ताहिक अहवाल सादर करावा, असे जिल्हा अाराेग्य अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. नवजात बालकाच्या डोक्याचा घेर ३१ सेंमीपेक्षा कमी असल्यास अशा बालकाला झिका आजाराची लागण झाल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे.  झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य अाजार असून तो १९४७ मध्ये युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ मध्ये युगांडा, टांझानिया या देशांत प्रथमच माणसांमध्ये तो दिसून आला. झिका विषाणू हा फलॅव्हिव्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या ब्राझीलसह लॅटीन अमेरिकेतील काही देशांमध्ये या आजाराची साथ सुरू आहे.    
 
झिकावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. मात्र, रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक असल्याने रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी, िनर्जलीकरण (डिहायड्रेशन) टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव्य पदार्थांचे सेवन करणे, तापासाठी पॅरासिटॅमाॅल औषध घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. अॅस्पिरिन अथवा एनएसएआयडी प्रकारातील औषधांचा मात्र वापर करू नये, असेही सुचवण्यात आले आहे.    
 
उपाययोजना आवश्यक
झिका आजार रोखण्यासाठी गराेदर मातांनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. याचबरोबर घर तसेच परिसरात पाणी साचून राहणार नाही, याबाबत सतर्कता राखायला हवी. विशेष म्हणजे एडिस डास दिवसा चावत असल्याने दिवसा झोपतानादेखील मच्छरदाणीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात पाण्याचे मोठे साठे असल्यास गप्पी मासे सोडण्याबरोबरच परिसरात धूर फवारणी करणे गरजेचे असून जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकांनी याविषयी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.    
 
आरोग्य यंत्रणा जागरूक :  डाॅ. सतीश पवार
झकाला रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून राज्यभर याविषयी जागरूकता माेहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषत: महिला रुग्णालयांना सावध करण्यात आले असून नवजात बालकांच्या डोक्याचा घेर कमी असल्यास त्याची नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे.
 
अशी आहेत झिका अाजाराची लक्षणे
‘झिका’ हा डेंग्यूसारखा असून ताप, अंगावर रॅश, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.  ती सर्वसाधारण सौम्य स्वरूपाची असून २ ते ७ दिवसांपर्यंत चालतात. झिका आजार झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही तसेच या मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.
बातम्या आणखी आहेत...