आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झीरो पोलिसांचा पोलिस ठाण्यात मुक्त संचार; अनिकेत कोथळे प्रकरणामुळे ‘झीरो पोलिस’ रडारवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सांगलीतील अनिकेत कोथळे कोठडी मृत्यू प्रकरणानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, तसेच प्रश्नचिन्ह ‘झीरो पोलिस’ या यंत्रणेबाबतही उभे राहिले आहे. कारण या प्रकरणातील सहापैकी पाच आरोपी पोलिस कर्मचारी आहेत, तर झाकीर पट्टेवाले हा एक आरोपी ‘झीरो पोलिस’ आहे. पोलीस विभागातील पदांच्या अधिकृत उतरंडीत ‘झीरो पोलिस’ हे पद नसतानाही प्रत्येक पोलिस ठाण्यात या झीरो पोलिसांचा मुक्त संचार असतो. काय आहे हे नेमके प्रकरण याचा घेतलेला हा वेध..  


एका अभियंत्याला लुटल्याच्या संशयावरून सांगली पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा पोलिस चौकशीदरम्यान झालेल्या मारहाणीत कोठडीतच मृत्यू झाला. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेदरम्यान उपनिरीक्षक युवराज कामटे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना झाकीर पट्टेवाला या झीरो पोलिसाने मदत केली. मृत्यू झालेल्या चौकशी कक्षातून मृतदेह कपड्यात लपेटून बाहेर काढून आंबोली घाटात नेऊन तो मृतदेह जाळण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पट्टेवालेचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पट्टेवालेच्या या सक्रिय सहभागामुळे झीरो पोलिस या अनधिकृत यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  


झीरो पोलिस म्हणजे काय?  
झीरो पोलिस किंवा झीरो नंबर या नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती म्हणजे पोलिस ठाण्यातील ‘हरकाम्या’. पोलिसांचा एखादा खबऱ्या किंवा एखाद्या छोट्या-मोठ्या आरोपात पकडला गेलेला, मात्र नंतर सुटलेला. एखादा पूर्वाश्रमीचा भुरटा गुन्हेगार, त्याच्या अंगभूत चापलुसीमुळे पोलिसांच्या मर्जीतला होऊन जातो. त्याचा पोलिस ठाण्यातील वावर वाढतो. पुढे अधिकाऱ्यांसाठी चहा आणून देणे, पोलिस ठाण्याची झाडलोट करणे, झेरॉक्स वगैरे आणून देणे, अशी पडतील ती कामे करत ही व्यक्ती काही अधिकाऱ्यांच्या अधिक जवळची होते. पुढे एखाद्या अधिकाऱ्याची हप्तावसुलीची जबाबदारी पार पाडणे, एखाद्या प्रकरणात लाचेची रक्कम थेट न स्वीकारता या व्यक्तीमार्फत स्वीकारली जाणे, अशा कामांतून या व्यक्तीचा ठाण्यातील वावर अधिक सहज होत जातो. खरे तर पोलिस व्यवस्थेत झीरो पोलिस नावाचे कोणतेही अधिकृत पद नाही, ही बाब खुद्द पोलिस महासंचालकांनीही मान्य केली आहे. तरीही निव्वळ एक सोय म्हणून हे पद आपसूकच निर्माण झाले आहे. या व्यवस्थेचा फायदा जसा पोलिस कर्मचाऱ्यांना होतो, तसाच तो या झीरो पोलिस म्हणवणाऱ्या व्यक्तीलाही होतो. कारण पोलिसांच्या ओळखीच्या बळावर ही व्यक्ती आपली खासगी कामेही विनासायास पार पाडत आपला मोबदला वसूल करत असते. 

 

दाऊदही एकेकाळी होता झीरो नंबर : सुरडकर  
याबाबत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुरडकर म्हणाले की, व्यवस्थेला वळसा घालून स्थापित झालेल्या अशा यंत्रणा जवळपास प्रत्येक खात्यातच असतात. त्याच पद्धतीने झीरो पोलिस ही जरी अधिकृत यंत्रणा नसली तरीही पोलिस खात्यात ती अस्तित्वात आहे. आणि ती चुकीची आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. दाऊद इब्राहिम हादेखील एकेकाळी स्थानिक पोलिसांचा झीरो नंबर होता. याचा अर्थ प्रत्येक झीरो पोलिस पुढे अट्टल गुन्हेगारच होतो असे नव्हे, असेही सुरडकर यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...