आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी १८ महापालिका, २६ जिल्हा परिषदांचा उडणार ‘बार’, राज्यातील २९६ पंचायत समित्यांसाठीही लवकरच होणार निवडणुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरत्या वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांतून जराशी उसंत मिळत नाही ताेच नवीन वर्षात सर्वच राजकीय पक्षांना व शासकीय यंत्रणेला अाणखी काही निवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागावे लागत आहे. नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला आणि मुंबईसह १८ महानगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुका या वर्षात होणार अाहेत. सत्ताधारी भाजप स्वबळाचा नारा कायम ठेवतो की शिवसेनेशी युती करतो या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले अाहे.   

देशात सतत कुठे ना कुठे निवडणुका सुरू असल्याने लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच घ्याव्यात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत सूतोवाच केले असून निवडणूक अायाेगानेही त्याबाबत मते मागवली अाहेत; परंतु किमान या वर्षी तरी पूर्वीची पद्धत सुरूच असल्याने राज्यात निवडणुकांचे वातावरण नेहमीप्रमाणेच दिसणार आहे. भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यापासून १९५ नगर परिषदा आणि १९ नगर पंचायतींच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. तीन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजप आघाडीवर राहिला असून काँग्रेसनेही चांगलेच यश मिळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या मोठ्या शहरांतील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. उल्हासनगर वगळता उर्वरित महापालिकांची मुदत मार्चमध्ये संपत आहे, तर उल्हासनगर पालिकेची मुदत तीन एप्रिल रोजी समाप्त होत आहे. या दहा महापालिकांसाठी जानेवारी महिन्यातच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता अाहे. मालेगाव (१४ जून), भिवंडी (१० जून), लातूर (२० मे), परभणी (१५ मे), चंद्रपूर (२९ एप्रिल), मीरा-भाइंदर (२७ ऑगस्ट), नांदेड-वाघाळा (३० ऑक्टोबर) या महापालिकांचा कार्यकाळही याच वर्षी संपत आहे. तसेच नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.  

नगरपालिकांचा चाैथा टप्पा रविवारी  
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा चौथा टप्पा अजून बाकी असून ११ नगर परिषदांसाठी आठ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दहा महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी २६ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समित्यांची निवडणूक घेतली जाणार आहे. या सर्व जिल्हा परिषदांची मुदत २१ मार्च, तर पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चौथ्या टप्प्यात पुढील निवडणुकांमध्येही आपले यश कायम ठेवेल का? आणि मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...