आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली बातमी: भुसावळ नगरपालिका होणार 10 मजली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेची ब्रिटिशकालीन इमारत आता लवकरच अत्याधुनिक रूप घेणार आहे. पालिकेच्या नवीन दहा मजली इमारतीच्या उभारणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टाउन प्लॅनिंग विभागाने छाननी केल्यानंतर नाशिक विभागीय कार्यालयात इमारतीचा आराखडा मंजुरीसाठी रवाना होईल. दरम्यान, नूतन इमारतीची प्रत्यक्ष उभारणी झाल्यास 10 मजली प्रशासकीय वास्तू असलेली भुसावळ पालिका नाशिक महसूल विभागातील एकमेव ठरणार आहे.

नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ब्रिटिशकालीन इमारत आता जीर्ण झाल्याने अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली. दरम्यान, नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सध्या खासगी कारणांमुळे सुटी घेतली आहे. याचदरम्यान त्यांनी प्रशासकीय इमारतीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या छाननी आणि प्लॅनिंगचे कामही पाठपुरावा करून मार्गी लावले.

सध्याची पालिकेची प्रशासकीय इमारत असलेल्या जागी सिटी सव्र्हे क्रमांक 2210 ते 2223 मधील 4414 चौरस मीटर क्षेत्रावर 10 मजली भव्य वास्तू उभारणे प्रस्तावित आहे. इमारतीला दोन मोठे जीना, दहाव्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था असेल. इमारतीच्या बेसमेंटवर व्यापारी संकुलाची निर्मिती होईल. तसेच तळमजल्यात भव्य पार्किंग झोन असेल. या कामाचा आराखडा आणि नकाशा तयार करण्यात आला आहे. मात्र, टाउन प्लॅनिंग विभागानेसुद्धा काही बदल सुचवले आहेत. याची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे.

जळगाव येथील आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांनी बांधकामाचा प्लॅन तयार केला असून तांत्रिक मंजुरीसाठी हालचाली सुरू आहेत. नाशिक विभागात भुसावळ पालिका एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असून दहा मजली इमारत झाल्यावर पालिकेच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पालिका इमारतीसोबतच नगरोत्थान योजनेच्या कामाला गती मिळणे अपेक्षित आहे.


'लिफ्टची व्यवस्था, शहराला मिळेल नवा लूक'
तांत्रिक माहिती
10 मजली इमारतीच्या उत्तरेकडे 18 मीटर, दक्षिणेकडे 12 मीटर आणि पश्चिमेकडे 24 मीटरचा रस्ता सोडण्यात येईल. प्रत्येक मजल्यावर 50 बाय 80 फुटाचे हॉल तयार करून त्यात प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मजला ठेवण्यावर भर राहणार आहे. प्रसाधनगृह, लिफ्ट यासह सर्व आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. हॉलमध्ये पार्टीशन करून विविध पोटविभाग तयार केले जातील. उर्वरित जागेचे टेरेस सोडले जाणार असून भविष्यात विस्तार करण्यासाठी या जागेचा उपयोग करता येईल. खान्देशातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिकेची शान यामुळे उंचावण्यास मदत होईल, असा नेमाडे यांचा दावा आहे.

परिश्रमाचे फलित
नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी खासगी सुटीवर असले तरी पालिकेच्या कामांकडे त्यांचे लक्ष आहे. वेळ मिळेल तेव्हा जळगावच्या टाउन प्लॅनिंग विभागात जाऊन त्यांनी 10 मजली प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळवण्याच्या कामाचा श्रीगणेशा केला. शहराशी संबंधित इतरही महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

यांनी घेतली मेहनत
बांधकाम विभागाचे नगरअभियंता व्ही.पी.भामरे, महेश चौधरी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अनिल चौधरी, प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले. प्रशासकीय इमारतीच्या प्लॅनिंगचे काम पूर्ण करून आता नाशिक येथून प्लॅन मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेवून काम सुरू होईल.

रोजगार मिळणार
पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बेसमेंटवर व्यापारी संकुलाची निर्मिती प्रस्तावित आहे. यामुळे बेरोजगारांनाही रोजगार मिळेल. बस आणि रेल्वेस्थानकजवळ असल्याने शहरातील सर्वात मोठे व्यापारी संकुल म्हणून त्याची भविष्यात गणना शक्य आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांना ही जागा सोयीची असल्याने पालिकेच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल.


माझे स्वप्न भुसावळ शहरात नवनिर्मितीचे
''पालिके ची भव्य प्रशासकीय इमारत असावी. या कामासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचणी दूर करून दहा मजली इमारत उभी राहिल्यावर शहराच्या सौंदर्यात भर पडेल. मनुष्यबळ कमी असतानासुद्धा पालिका कर्मचारी अधिक काम करत आहेत. त्यांचे कौतुक आहेच. नवनिर्मितीचे स्वप्न सर्व मिळूनच पूर्ण करण्याचा ध्यास आहे.''
-उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका