आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीमध्ये जळगावच्या प्रेक्षकांना दहा नाटकांचे प्रयोग बघण्याची मिळणार पर्वणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाबळ येथील वातानुकूलीत बंदिस्त नाट्यगृहाचा शुभारंभ जानेवारी रोजी होणार असून यानिमित्ताने जळगावकर प्रेक्षकांना १० नाटकांचे प्रयोग बघण्याची पर्वणी प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळी नाट्यगृहाची पाहणी करताना दिली.

 

नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे असल्याने येत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अपूर्ण असलेल्या कामांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंत्राटदारास दिल्यात. सद्य परिस्थितीमध्ये शहरातील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिकची रंगरंगोटीची कामे सुरू असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिले. नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करून पहिले १० प्रयोग नाममात्र शुल्क घेऊन नाट्य रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. या वेळी आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, उदय वाघ, भरत अमळकर यांच्यासह सार्वजनिक विभागाचे अधिकारी कंत्राटदार उपस्थित होते.

 

नाट्यगृहाला 7  कोटी लागणार
नाट्यगृहाच्या सीलिंगचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सभागृहातील खुर्च्याही आलेल्या आहेत. उर्वरित कामांसाठी 7 कोटी रुपये लागणार आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा निधी डीपीडीसीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...