आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात पाच महिन्यांत 100 औषध विक्रेत्यांनी केले परवाने जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्याचे आयुक्त महेश झगडे यांनी फार्मासिस्ट नसलेल्या औषध विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावल्याने पाच महिन्यात जिल्ह्यातील 100 केमिस्टने प्रशासनाकडे लायसन्स सरेंडर केले आहेत. यासंदर्भातील कारवाईचे सत्र पुन्हा सुरू झाले असून आठवडाभरात जिल्ह्यातील 8 जणांचे परवाने जागीच रद्द करण्यात आले आहेत. ही मोहीम सुरूच राहणार असून औषध विक्रेत्यांसमोर फार्मासिस्ट नेमणे अथवा दुकान बंद ठेवणे हेच पर्याय उरले आहेत.

फार्मासिस्टशिवाय औषध विक्रीचे दुकान सुरू ठेवू नये असा आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी काढल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून केमिस्ट संघटनेने वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु कारवाईचा धडाका सुरूच राहिल्याने अनेकांवर कारवाईचा बडगा उचलला गेला. फार्मासिस्ट नसलेल्या 100 औषध विक्रेत्यांनी कारवाईच्या टांगती तलवारीला कंटाळून आपले लायसन्स थेट प्रशासनाकडे जमा केले आहे. तसेच 10 विक्रेत्यांना औषध विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले. एप्रिल 2013 पासून आजपर्यंत फार्मासिस्ट नसलेल्या 15 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर विक्रीचे बिल न देणार्‍या 4 जणांचे परवाने रद्द केलेत. किरकोळ कारणांसाठी दोषी ठरलेल्या 25 विक्रेत्यांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत.

पुन्हा कारवाईचा धडाका
राज्याच्या आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा औषध दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यात चांगदेव येथे 3, मुक्ताईनगर व अमळनेर येथे प्रत्येकी 2 तर चाळीसगाव येथे 1 अशा आठ औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याने त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे औषध विक्रे त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डॉक्टरांचा व्यवसाय वाढणार
साधारण डोकेदुखी, पोटदुखी यासारखा त्रास होत असेल तर नागरिकांना डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी घेणे बंधनकारक ठरणार आहे. कारण त्याशिवाय औषध विक्रेत्यांनी औषधी दिल्यास त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ कारणांसाठी डॉक्टरांकडे जाणे परवडत नाही त्यामुळे सामान्यांचे हाल होऊन डॉक्टरांचा व्यवसाय वाढणार असल्याची टीका होऊ लागली आहे.

कारवाई सुरूच राहणार
राज्यभरात तपासणी मोहीम सुरू आहे. जळगावातही निरीक्षकांमार्फत सर्वत्र तपासणी सुरू झाली असून जिल्ह्यात 8 जणांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात आली आहे. फार्मासिस्ट नसणे, विक्रीची बिले न देणार्‍यांवर प्रशासनाची नजर आहे. आगामी काळातही कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. -एच.वाय.मेटकर, सहायक आयुक्त, औषध प्रशासन.

नियमांचा भंग करू नका
प्रशासनाने पुन्हा तपासणी मोहीम सुरू केल्यामुळे औषध विक्रेत्यांनी फार्मासिस्टशिवाय औषध विक्री करू नये. नियम मोडून व्यवसाय केल्यास प्रशासनाकडून परवाना रद्दची कारवाई होऊ शकते. रुग्णांना वेठीस न धरता नियमानुसार काम करावे.
-सुनील भंगाळे, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट असोसिएशन