आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडघम विधानसभेचे - धुळे शहर, ग्रामीणमधून अकरा इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विशेष म्हणजे जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या धुळे शहर, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातूनही भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करण्यासाठी अकरा जण इच्छुक असल्याचे मुलाखतीवेळी स्पष्ट झाले.
साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी सात इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्याचबरोबर इतर काही पक्षातील पदाधिका-यांनी उमेदवारीसाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक चैनसुख संचेती यांची भेट घेतली.
येथील अजय लॉन्समध्ये मुलाखती झाल्या. या वेळी पक्षनिरीक्षक आमदार चैनसुख संचेती, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे बुलडाणा जिल्ह्याचे महामंत्री मोहन शर्मा, सरचिटणीस आमदार जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, अनूप अग्रवाल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंद्रकला सिसोदिया, भारती माळी, संघटनमंत्री भीमसिंग राजपूत आदी उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या बंद खोलीत मुलाखती झाल्या. साक्री मतदारसंघातून सात इच्छुकांनी मुलाखती दिल्या. शिरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. पी. एस. अंतुर्लीकर, राकेश पावरा यांनी लढविण्याची तयारी दाखविली. धुळे विकास मंचचे अ‍ॅड. नितीन चौधरी यांनीही निरीक्षक संचेती यांची भेट घेतली.

फजिती नको म्हणून...
भाजपच्या वाटेला नसलेल्या धुळे शहर, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठीही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सद्य:स्थितीत शिवसेना-भाजपच्या युतीविषयी चर्चा सुरू आहे; परंतु भविष्यात प्रश्न निर्माण झाल्यास ऐन वेळेवर फजिती होऊ नये यासाठी हा मार्ग पत्करण्यात आला. काही पदाधिका-यांनी दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली. या वेळी डॉ. माधुरी बाफनाही भेटीला येणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मुलाखतीनंतर निरीक्षकांनी पदाधिका-यांशी गटा-गटाने चर्चा करून उमेदवार व मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने इच्छुक समर्थकांसह उपस्थित होते. घोषणाबाजी न करता सर्वांनी शांततेत मुलाखती दिल्या. मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात चैनसुख संचेती यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी तयारीचा आढावा घेतला.

मुंडेंचे स्वप्न पूर्ण करा
४सत्ता सेवेचे साधन आहे. देशाला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न होत आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात सत्ता मिळविण्याचा संकल्प केला होता. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. निवडणुकीसाठी साठ दिवस शिल्लक असल्याने गटबाजी बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे.

चैनसुख संचेती, पक्ष निरीक्षक
भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. पक्षातर्फे ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्याची सर्वांची जबाबदारी आहे. जयकुमार रावल, सरचिटणीस, भाजप

धुळे शहर: अ‍ॅड. नितीन चौधरी, डॉ. व्ही. एस. पाटील, विनोद मोराणकर, सुनील तुकाराम नेरकर, अनूप अग्रवाल, संदीप अग्रवाल, संजय बोरसे.
धुळे ग्रामीण: अमर पाटील, रामकृष्ण खलाणे, भाऊसाहेब देसले, अ‍ॅड. राहुल पाटील.
साक्री: मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित, मोहन सूर्यवंशी, लीना सूर्यवंशी, अनिल बागुल, मणिराम अहिरे, चुडामण पवार.
शिरपूर: डॉ. जितेंद्र ठाकूर, रणजित पावरा, डॉ. राकेश पावरा, प्रा. पी. एस. अंतुर्लीकर (राष्ट्र वादी सदस्य), रणजित पवार, अनारसिंग पावरा, पंडित पावरा.
शिंदखेडा: जयकुमार रावल, सुभाष माळी.