आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ जनावरांचा गुदमरून मृत्यू, विटव्याजवळ तस्करी उघड, १७ जनावरांवर गो-शाळेत उपचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर- मध्यप्रदेश पासिंगच्या ट्रकमधून गो-वंशीय जनावरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा अमानुष प्रकार बुधवारी सकाळी वाजेच्या सुमारास विटव्याजवळ उघडकीस आला. दोन कप्पे करून ट्रकमध्ये भरलेल्या या ३५ जनावरांपैकी १४ गायी-गोऱ्ह्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर अत्यवस्थ असलेल्या १७ गायींवर रावेरातील श्रीकृष्ण गो-शाळेत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

मुक्ताईनगरकडून गायी-गोऱ्ह्यांनी खचाखच भरलेला ट्रक (क्रमांक एमपी.०९-केडी.१२३१) रावेरकडे येत होता. बुधवारी सकाळी वाजेच्या सुमारास हा ट्रक विटवे गावाजवळ आल्यावर त्याचे चाक अचानक रस्त्यावरील चाकोरीमध्ये रुतले. परिणामी ट्रकला विटवा-निंभोरासिम बायपास रस्त्यावर थांबणे भाग पडले. मात्र, ट्रकमधून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने विटवा येथील तरुणांनी चालक-क्लीनरकडे विचारपूस केली. मात्र, काही कळण्याच्या आत दोघांनी ट्रक सोडून पोबारा केला. दरम्यान, ट्रकमध्ये गुरे असल्याचा संशय बळावल्याने तरुणांनी ही माहिती तहसीलदार कुंदन हिरे, निंभोऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भुजबळ यांना कळवली. यानंतर काही वेळातच प्रांताधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर, डीवायएसपी योगेश चव्हाण, रावेर, सावदा, निंभोऱ्याचा फौजफाटा घटनास्थळी आला. त्यांनी केलेल्या तपासणीत ट्रकच्या दोन कप्प्यांमध्ये ३५ जनावरे आढळली. त्यापैकी १४ गायी आणि गोऱ्ह्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर अत्यवस्थ १७ गायींवर श्रीकृष्ण-गो शाळेत उपचार सुरू आहेत. तर संबंधित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

गो-वंश हत्याबंदी कायद्याने गुन्हा दाखल होईल. सध्या पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहोत. पंचनाम्याचे काम पूर्ण होताच पोलिस स्वत: फिर्यादी होवून तक्रार दाखल करतील. सुदाम भुजबळ, सहायकपोलिस निरीक्षक, सावदा

थांबलेल्या ट्रकमधूनप्रचंड दुर्गंधी येत असल्याबाबत सकाळीच निरोप मिळाला. यानंतर रावेर तहसीलदार, निंभोरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर अधिकारी, फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. चंदन पाटील, सदस्य,ग्रामपंचायत विटवा.

राज्यात गो-वंशहत्याबंदी कायदा लागू आहे. तरीही तालुक्यात गुरांची बेदकारपणे वाहतूक रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. यामुळे आंदोलन उभारून जाब विचारणार आहोत. भास्कर महाजन, अध्यक्ष,अंबिका व्यायामशाळा, रावेर

जमाव झाला संतप्त
गायींचा ट्रक पकडल्याची माहिती पसरताच निंभोरासिम, विटवा येथील अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्तेदेखील हजर होते. महाराष्ट्रात गो-वंश हत्याबंदी कायदा असूनही गुरांची एवढी निर्दयीपणे वाहतूक कशी? असा प्रश्न जमावाने उपस्थित करून तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, अधिकाऱ्यांनी सर्वांची समजूत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसांचा कानाडोळा
गेल्या वर्षी रावेर तालुक्यातील चोरवड येथे गुरांची वाहतूक करणारा पकडलेला ट्रक नागरिकांनी पेटवून दिला होता. यानंतर गुरांची तस्करी करणाऱ्यांना बऱ्यापैकी जरब बसली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पहिल्यासारखी स्थिती आहे.

गुरे नदीपात्रात पुरली
मोरगाव येथे पशुसंवर्धन विभागाच्या कार्यक्रमासाठी जाणारे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रकाश इंगळे, रावेरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय खाचणे, डी. आर. महाजन, डॉ. उदय उतारी यांनी माहिती मिळताच विटव्याजवळील घटनास्थळ गाठून जखमी गुरांवर उपचार केले. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांना नदीपात्राशेजारी पुरण्यात आले.