आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाचित्रांच्या माध्यमातून जळगावात पकडले 15 आरोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विविध प्रकारच्या गुन्ह्यात नागरिकांना गुंगारा देऊन पळून जाणार्‍या चोरट्यांची रेखाचित्रे काढून ओळख पटवली जाते. या रेखाचित्रांवरून तीन वर्षांत जिल्हाभरातून 15 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात जळगाव शहरातील 14 संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोनसाखळीचोरी, मारहाण करून चोरी करणे, खून करून पळून जाणे अशा घटनांमध्ये अनेकदा प्रत्यक्षदर्शी असतात. गुन्हेगारांचा चेहरा पाहणार्‍या या प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिस यंत्रणा गुन्हेगारांची रेखाचित्रे तयार करतात. त्या आधारावर सराईत गुन्हेगारांची चौकशी केली जाते.

तसेच रेखाचित्र चेहर्‍याशी मिळतेजुळते असल्यास संबंधित चोरट्यांच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सहज शक्य होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चोपडा, बोदवड, चोपडा आणि चाळीसगाव या सात तालुक्यांत तीन वर्षांत 63 गुन्हेगारांची रेखाचित्रे तयार करण्यात आली होती. त्यापैकी 15 गुन्हेगारांना केवळ रेखाचित्रांच्या आधारावर अटक करण्यास पोलिसाना यश आले आहे.

चोरी, दरोड्यातील आरोपी
जिल्ह्यातील चोरी, दरोडा, जबरी लूट या गुन्ह्यांतील सहा आरोपी व फसवणुकीच्या दोन आरोपींना ओळखण्यात रेखाचित्रांची मदत झाली आहे. तसेच खुनाच्या गुन्हय़ातील दोन गुन्हेगारही रेखाचित्रांच्याच आधारे पकडण्यात आले आहेत. नेहमी चोरी, दरोडामधील आरोपींची संख्या मोठय़ा प्रमाणात असते.

अत्याधुनिक सॉफ्टवेअरमुळे काम सोपे
पूर्वी पोलिस कर्मचार्‍यांना हाताने पेन्सिलचा वापर करून रेखाचित्र तयार करावे लागत होते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वीच्या पद्धतीवर तोडगा काढण्यात आला असून, ‘पोट्र्रेट बिल्डिंग’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकावर रेखाचित्र तयार करण्यात येते. विशेष म्हणजे, या सॉफ्टवेअरमध्ये रंगीत रेखाचित्रही काढता येते.