आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिकेने १० महिन्यांत केली १८ टक्के वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नाशिक विभागातील भुसावळ ही एकमेव ‘अ’ नगरपालिका आहे. मात्र, ती यंदा करवसुलीत पिछाडीवर आहे. आर्थिक वर्षातील १० महिने लोटले गेले तरी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पालिकेची करवसुली फक्त १८ टक्के झाली आहे. अत्यल्प वसुलीमुळे मूलभूत सेवासुविधांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. करदात्यांकडून करमागणीचे पत्रकही पालिका प्रशासनाने अद्याप छापले नसल्याचे चित्र आहे.
शहरातील विकासकामे करण्यासाठी पालिका फंडात गंगाजळी असणे आवश्यक आहे. शहरातील करदात्यांकडून मिळालेल्या कर रकमेतून पालिका फंडात रक्कम जमा होते. आगामी आर्थिक वर्षात या रकमेतून शहरातील विकासात्मक कामांवर निधी खर्च होतो. यामुळे उद्दिष्टाच्या तुलनेत किमान ८० टक्के करवसुली होणे आवश्यक असते. यंदाच्या वर्षात मात्र, शहरात अत्यल्प करवसुली करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत शहरातील करदात्यांकडून पालिकेला केवळ १४ टक्के रक्कम वसूल करण्यात यश आले आहे.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शहरातील विकासात्मक कामांसाठी निधी उभारला जाणार नाही. यामुळे विविध कामांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाला ऐनवेळी करावयाची विकासकामे करता येणार नाहीत. सर्वसामान्यांच्या सेवेलाच फटका बसणार आहे. पालिका प्रशासनाकडून गेल्या अडीच वर्षांच्या काळात शहरवासीयांना अंत्यत त्रोटक दर्जाच्या सेवा मिळाल्या आहेत.

बैठक केवळ कागदावर

करवसुलीसाठी मुख्याधिकारी भारत राठोड यांनी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेणे, विविध अडचणी समजून घेऊन निराकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून यासंदर्भात बैठक झाली नाही.

असे आहे वसुली उद्दिष्ट

नगरपालिका प्रशासनाला सन २०१४- १५ या अर्थिक वर्षाच्या करापोटी नागरिकांकडून १९ कोटी ४८ लाख ५५ हजार १३४ रुपये करवसूल करावयाचा आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ कोटी ११ लाख ३४ हजार ८०२ रुपयांची वसुली झाली होती. सध्या हा आकडा तीन कोटींच्या जवळपास आहे. उद्दिष्टाच्या निम्मेही करवसुली होणे कठीण आहे. ती झाली नाही तर विकासाचा गाडा रुतेल, हे निश्चित.

ऐतिहासिक निच्चांक

पालिका प्रशासनाने गेल्या २० वर्षांत एकाही वेळी ५९ टक्क्यांपेक्षा कमी वसुली केलेली नाही. यंदाच्या वर्षी मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ १४ टक्के करवसुली करण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत किमान ६० टक्क्यांपर्यंत करवसुली झाल्यास हा ऐतिहासिक निच्चांक ठरणार आहे. सेवासुविधांवर त्याचा परिणाम हाेईल.

उद्दिष्टपूर्तीचे प्रयत्न सुरूच

^पालिकेच्या करवसुली विभागाला जर प्रशासकीय पातळीवरून मदत झाली तर नक्कीच करवसुलीची टक्केवारी वाढेल. परंतु स्टेशनरी, मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामुग्री मिळत नाही. यामुळे अडचणी वाढतात. मुख्याधिकाऱ्यांनी विभागाला आवश्यक स्टेशनरी वेळेत द्यावी. निश्चितच उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे प्रयत्न आहेत. प्रकाशकोळी, करअधीक्षक, नगरपालिका

प्रशासकीय यंत्रणाच संथ

^मुख्याधिकारी भारत राठोड यांनी करवसुलीसाठी प्रयत्न करावेत, यासंदर्भात अनेकवेळा चर्चा झाली. प्रशासकीय कामेच संथगतीने सुरू असल्याने करवसुलीचा निच्चांक गाठला जात आहे. शहराच्या विकासात्मक धोरणांसाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणे गरजेचे आहे. शहरासाठी बरेच काही करण्याची आंतरीक इच्छा आहे. मात्र, स्थानिक प्रशासन योग्य सहकार्य करीत नसल्याची खंत आहे. अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष