आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९ ठिकाणी ७८ सीसीटीव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, पोलिस प्रशासनाने शहरात १९ ठिकाणी एकूण ७८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा जम्बो प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे ४९ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला जाणार आहे. यानुषंगाने पाठपुरावा सुरू आहे.

मोहन बारसे यांच्या खून प्रकरणामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अद्यापही शहरात अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम आहे. तसेच यापूर्वीच्या काळातही शहरात गुन्ह्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढता असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने पालिकेच्या माध्यमातून शहरात १३व्या वित्त आयोगातून, ७८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. मात्र, पालिकेने अद्यापही याबाबत पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्हीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

अधिक क्षमतेचे डीव्हीआर बसवणार
शहरात७८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असले, तरी प्रत्यक्षात मात्र वाढीव कॅमे-यांचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) बसवले जाणार आहे. डीव्हीआरच्या वाढीव क्षमतेमुळे भविष्यात सीसीटीव्हीची संख्या ९६पर्यंत वाढवता येणार आहे. अत्याधुनिक सीसीटीव्हीमुळे सर्व हालचाली कॅमे-यात कैद होतील. चित्रीकरण झालेल्या एखाद्या वाहनाचा क्रमांकही झूम करून पाहता येईल. शहरात एकूण १९ ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. शहरातील कॅमे-यांद्वारे होणारे चित्रीकरण पोलिस कंट्रोल केबनिमध्ये दोन मोठ्या टीव्हीच्या माध्यमातून दिसेल. सुमारे महीनाभराचे चित्रीकरण डीव्हीआरमध्ये साठवता येईल.

ठिकाणे निश्चित
जळगावरोड-वाय पॉइंट, सरदार वल्लभभाई पटेल चौक, गांधी पुतळा, यावल नाका, पाणी गेट, बाजारपेठ चौक, पांडुरंग टॉकीज चौक, नाहाटा चौक, रेल्वेस्थानक परिसर, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, जाम मोहल्ला, रजा टॉवर, खडका चौफुली, वरणगाव नाका, गांधी चौक, जुम्मा मशीद परिसर, अप्सरा चौक, भारत मेडिकल, हद्दीवाली चाळ

बैठकीत घेतला निर्णय
काहीदिवसांपूर्वी जळगाव येथे जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, डीवायएसपी रोहदिास पवार यांनी सीसीटीव्हीचा विषय मांडला होता. या प्रस्तावाला बैठकीत मान्यता मिळाली होती, तसेच याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचे पोलिसांनी सर्वेक्षण केले आहे. कॅमेरे बसवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत.

प्रस्तावाला मान्यता अपेक्षित
डीवायएसपीपवार यांनी जळगाव येथून प्रस्ताव आणि सीसीटीव्हीचे कोटेशन घेऊन प्रस्ताव तयार केला आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. शहरातील सद्य:स्थिती लक्षात घेता प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हालचालींवर बारीक लक्ष
सुरुवातीलापालिकेस सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिला आहे. आता नव्याने हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला दिला जाणार आहे. यामुळे हालचालींवर लक्ष ठेवता येईल. रोहिदास पवार, डीवायएसपी, भुसावळ