आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मास्टर की’ वापरून दुचाकींची चोरी; नंतर अर्ध्या किमतीत विक्री, दोन जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘मास्टर की’ वापरून शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना शनिवारी पहाटे पाच वाजता शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चोरलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात अाल्या असून आणखी १० पेक्षा जास्त गाड्या त्यांच्याकडून मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रवींद्र मोतीलाल कुमावत (वय २३, रा. समतानगर) आणि रवी रामेश्वर इंगळे (वय २५, रा. शाहूनगर) अशी संशयितांची नावे आहेत. 
 
चार वर्षांपूर्वी रिक्षाचालक असलेले रवींद्र कुमावत रवी इंगळे हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. ‘इझी मनी’ मिळवण्याच्या नादात त्यांनी दुचाकी चोरीचा ‘गोरख धंदा’ सुरू केला होता. गर्दीच्या ठिकाणावरून ‘मास्टर की’चा वापर करून दुचाकी चोरून निर्मनुष्य ठिकाणी ते दुचाकी उभी करून ठेवत असत. त्यानंतर काही दिवसांनी ग्राहकाचा शोध घेऊन कमी-अधिक किमतीमध्ये दुचाकी विकून टाकत. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांची माहिती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. 
 
विशिष्ट प्रकारच्या दुचाकीला प्राधान्य 
यादोघांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या दुचाकींचाच अधिक समावेश आहे. बाजारात या दुचाकीला चांगली मागणी असल्यामुळे त्यांनी हीच दुचाकी चोरण्यास प्राधान्य दिल्याची माहिती समोर आली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी नवीपेठ परिसरातून चोरीस गेलेल्या दोन्ही दुचाकी चोरल्याची कबुली देखील त्यांनी दिली. 

2 दिवसांपासून पाळत 
हे दोघे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त करणे कठिण होते. परंतु, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या दाेघांच्या हालचाली दोन दिवसांपासून टिपल्या जात होत्या. या दोघांनी शुक्रवारी दुपारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातून एक दुचाकी लंपास केली. त्यावेळी देखील पोलिसांची त्यांच्यावर पाळत होती. अखेर पहाटे पाच वाजता दोन वेगवेगळे पथक तयार करून दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडून माहिती मिळवल्यानंतर दुचाकींच्या संख्येसह संशयित देखील वाढणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...